Saturday, 23 July 2016

लोकमान्य टिळक यांनी जाज्वल्य राष्ट्रभक्ती जागृत केली : सुकृत खांडेकर












               लोकमान्य टिळक यांची 160 वी जयंती राजधानीत साजरी
नवी दिल्ली, 23 : लोकमान्य टिळक यांनी पारतंत्र्याच्या काळात भारतीयांमध्ये जाज्वल्य राष्ट्रभक्ती निर्माण केली, असे प्रतिपादन केसरी वृत्त पत्राचे कार्यकारी संपादक सुकृत खांडेकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र परिचय केंद्रात लोकमान्य टिळक यांची 160 वी जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी श्री खांडेकर बोलत होते. यावेळी परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, पत्रकार कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थिातांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण अभिवादन केले.
जवळपास शंभर सवाशे वर्षापूर्वी देश  पारतंत्र्यात असतांना लोकमान्य टिळक यांनी ब्रिटीशांच्या विरोधात तत्कालीन परिस्थितीत केलेले आंदोलन भारतीयांना सदैव स्फूर्ती देयक राहील. शिक्षक, सामाजिक क्षेत्रात, पत्रकार, या सर्वच क्षेत्रात टिळकांनी काम केले असून या प्रत्येक क्षेत्रातून राष्ट्रभक्तीचा संदेश दिला असल्याचे श्री खांडेकर म्हणाले.
टिळकांची प्रत्येक कृती ही आरचणीय आहे. विपरीत परिस्थितीत मनोबल न ढासळता जिद्दीने सतत काम  करत राहण्याची प्रेरणा लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तीत्वातून मिळते. त्यांच्या हयातीतच  टिळकांना मोठेपण लाभले. त्यामुळेच देशभरात लोकमान्य टिळकांच्या प्रतिमा त्यांच्या नावाच्या संस्था, मंडळे आहेत व सर्व भारतभर त्यांची जयंती मोठया उत्साहाने साजरी केली जाते, असेही श्री खांडेकर म्हणाले.
आज लोकप्रिय असणारी राजकीय पत्रकारीतेचा पाया हा लोकमान्य टिळकांनी रचला असल्याचे, उपसंचालक  दयानंद कांबळे म्हणाले.  संपादक म्हणून संपूर्ण जबाबदारी स्वीकारून वेळे प्रसंगी तुरूंगवासही सहन करणारे असे टिळकांचे ठाम व्यक्तीमत्व होते. त्यांनी सुरूवात केलेल्या प्रखर पत्रकारितेमुळे ब्रिटीश सरकारही घाबरले होते. वाचकांशी पत्रव्यवहार, संवाद आणि पारतंत्र्यांची प्रखर जाणीव त्यांच्या लेखातून दिसून येत होती. देशाभिमान, स्वदेशीचा वापर, सार्वजनिक गणेशात्सावाच्या माध्यमातून लोकजागृती अशा अनेक गोष्टी त्यांनी केल्या, त्यांची संपूर्ण जीवनगाथा आजही प्रेरणास्त्रोत असल्याचे श्री कांबळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळकांना अभिवादन



कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी लोकमान्य टिळक यांच्या  प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

No comments:

Post a Comment