Thursday, 11 August 2016

लघु उद्योग नोंदणीची देशव्यापी मोहीम राबविण्यात यावी - सुभाष देसाई

















नवी दिल्ली, दि.11 : देशातील लघु उद्योगांची नोंदणी करण्यासाठी देशव्यापी  मोहीम हाती घ्यावी अशी सूचना  राज्याचे उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे केली.  
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आयोजित संचालक मंडळाच्या १४ व्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते लघु उद्योगाची संपूर्ण डेटा बँक असलेल्या पोर्टलचे उदघाटन झाले. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री कलराज मीश्र आणि  सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग राज्य मंत्री द्वय गिरीराज सिंह व हरीभाई चौधरी  यावेळी उपस्थित होते. या बैठकीस विविध राज्यांचे उद्योग मंत्री उपस्थित होते.  
यावेळी श्री. देसाई म्हणाले, देशात मोठया प्रमाणात लघु उद्योग आहेत, मात्र त्यांची एका ठिकाणी नोदंणी नाही. ही बाब लक्षात घेता लघु उद्योग नोंदणीची देशव्यापी मोहीम राबविण्यात यावी अशी सूचना त्यांनी मांडली. नोंदणी झालेल्या लघु उद्योगांचे वर्गीकरण करण्यात यावे.आणि अशा उद्योगांना कौशल्य विकास, तंत्रज्ञान सहाय्य उपलब्ध करून दिले पाहीजे असेही श्री. देसाई म्हणाले. राज्यातील लघु उद्योगांना केंद्रशासनाकडून अर्थ सहाय्य व्हावे अशी मागणी श्री. देसाई यांनी केली. रिझर्व्ह बँकेने लघु उद्योगांना अर्थ सहाय्य करण्याच्या मार्गदर्शक सूचना राष्ट्रीयकृत बँकाना दिल्या आहेत. मात्र, लघु उद्योगांना कर्ज देताना या बॅका टाळाटाळ करतात. केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने बँकाना या संदर्भात सक्त सूचना द्याव्यात असे श्री. देसाई म्हणाले.  
 केंद्राकडे प्रलंबित असलेल्या राज्य शासनाच्या समूह विकासा(क्लस्टर डेव्हलपमेंट) च्या प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळावी अशी मागणीही त्यांनी  यावेळी केली.  केंद्र शासनाच्या लघु उद्योगासंदर्भातील योजनांची प्रभावी अमंलबजावणी राज्यात सुरु आहे. लघु उद्योगासंदर्भातील सर्वच योजनांची अमंलबजावणी करण्यात राज्याने देशात अग्रस्थान मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले.

                                                                   000000 

No comments:

Post a Comment