नवी दिल्ली, 16: “भारत पर्व” मध्ये महाराष्ट्राच्या लघु उद्योजकांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले असून त्यांच्या वस्तूंची मोठया प्रमाणात विक्री होत असल्याचे चित्र आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देशाचा गौरवपूर्ण इतिहास व वैविध्यपूर्ण संस्कृती, हस्तकला दर्शविणा-या ‘भारत पर्व’ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध राज्यांनी या प्रदर्शनात आपल्या राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण हस्तकलेच्या वस्तू प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवल्या आहेत. महाराष्ट्र दालनात महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या माध्यमातून लघु उद्योजकांच्या हस्तकलेचे प्रदर्शन व विक्री येथे सुरु आहे. राज्यातील लघु उद्योजकांना या माध्यमातून उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या उद्योजकांच्या वस्तूचीं मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याबद्दल ते समाधान व्यक्त करीत आहेत. प्रदर्शनाचा आजचा चौथा दिवस असून प्रदर्शनास भेट देणा-यांनी महाराष्ट्राच्या हस्तकला दालनात गर्दी केली .
पैठणीसह अन्य साड्या येथे प्रदर्शन व विक्रीसाठी मांडण्यात आल्या आहेत. या विषयी राज्याच्या औरंगाबाद जिल्हयातील पैठणचे हस्तकलाकार जितेंद्र परदेशी सांगतात, “पैठणीसह महाराष्ट्रातील साडयांचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून या प्रदर्शनांमध्ये राज्य शासनाच्या लघु उद्योग विकास महामंडळाने आम्हाला सहभागाची संधी दिली आहे. महाराष्ट्र दालनास भेट देणा-या महिलांची पुणेरी कॉटन साडीला विशेष मागणी आहे. साडीची रंगसंगती , रचना उत्तम असल्याने आणि ही साडी परिधान करण्यास खूपच सोयीची असल्याने ही साडी महिलांना पसंत पडत आहे. दिल्लीतील प्रदर्शनात सहभागी होताना आम्ही येथील बाजार पेठेचे आणि महिलांच्या आवडी-निवडीचा आधी अभ्यास करून सज्जतेने या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे”.
सेालापूरचे लघु उद्योजक राजेंद्र अंकम गेल्या 36 वर्षापासून विणकर क्षेत्रात आहे. महाराष्ट्र दालनात त्यांनी वॉल हॅकींगच्या वस्तु प्रदर्शन व विक्रीस ठेवल्या आहेत. कटवर्क, बॅग, पोट्रेट , सुतापासून तयार केलेली विवेकानंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींची तयार केलेली व्यक्ती चित्रे येथे आहेत. श्री.अंकम महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाशी गेल्या 7 वर्षापासून जुळले असून प्रगती मैदान, दिल्ली हाट नंतर आता राजपथवर आपल्या वस्तुंची प्रदर्शन व विक्री करत आहेत. याठिकाणी आपल्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळल्याबद्दल ते समाधानी आहेत.
अमरावती जिल्ह्यातील अचलपूरचे महम्म्द इकबाल लखेरा आणि अफझल जावेद लखेरा यांचा लाखाच्या बांगड्यांचा व्यवसाय आहे. त्यांनी ही महाराष्ट्र दालनात वैविध्यपूर्ण बांगड्या प्रदर्शन व विक्रीसाठी महाराष्ट्र दालनात ठेवल्या आहेत. गेल्या 10 वर्षापासून ते या व्यवसयात आहेत. घरातील महिलाही या व्यवसायात मदत करीत असल्याचे ते सांगतात. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडाळाशी ते मागील वर्षी जुळले आहेत. पहिल्यांदाच ते दिल्लीतील प्रदर्शनात भाग घेत आहेत. त्यांना येथे मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळत असल्यामुळे ते आनंद व्यक्त करत आहेत. या प्रदर्शनाच्या उर्वरित दिवसांत मोठ्या प्रमाणात विक्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. प्रगती मैदान आणि दिल्ली हाट येथे होणा-या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचे त्यांनी सांगितले.
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील बानगे येथील लघु उद्योजक राजेंद्र शिंदे यांचा कोल्हापुरी चप्पल व अन्य पादत्राणांचा स्टॉल येथे आहे. गणतंत्र दिवसाचे पथसंचलन ज्या राजपथावर होते आणि प्रत्येक भारतीयांचे मन स्वाभिमानाने भरुन येते. तेथे कोल्हापूरी चप्पल विक्री व प्रदर्शन करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य समजतो, असे ते म्हणतात. कोल्हापुरी चप्पलला प्रचंड मागणी असून त्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट व दूरचित्रवाणीवरील मालिकांमधून कोल्हापूरी चप्पलीची माहिती ग्राहकांना मिळाली असल्याचे ते सांगतात. या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील मडीलगे येथील त्यांचे गुरु आनंदा रावण त्यांच्या सोबत आहेत.
पालघर जिल्ह्याच्या मोखाळा तालुक्यातील वासाळा येथील लघु उद्योजक विठ्ठल डगळ यांच्या वारली पेंटींग चा स्टॉल येथे बघायला मिळतो. गेल्या चार वर्षापासून ते या व्यवसायात आहेत. महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाशी गेल्या दोन वर्षापासून ते जोडले गेले आहेत. या आधी दिल्ली हाट येथे त्यांनी प्रदर्शनात भाग घेतला व त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. राजपथावरील भारत पर्व या प्रदर्शनातील महाराष्ट्र दालनात ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे श्री डगळ सांगतात.
No comments:
Post a Comment