नवी
दिल्ली दि. 09 : भारत
छोडो आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन आणि हैद्राबाद मुक्तीसंग्रामात मोलाचे योगदान
देणा-या महाराष्ट्रातील ५ स्वातंत्र्य सैनिकांचा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी
यांच्या हस्ते आज सन्मान करण्यात आला.
क्रांतिदिनाचे औचित्य
साधून भारत छोडो आंदोलनाच्या 74 व्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात शानदार
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र चळवळीत योगदान देणा-या देशाच्या विविध भागातील स्वातंत्र्य सैनिकांचा
यावेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात
राज्यातील नागपूरचे शेषराव बडवाइक, चंद्रपूरचे डॉ.शेषराव इंगोले, नांदेड
जिल्हयातील देगलुरचे कृष्णराव देशपांडे, मुंबई उपनगरचे नागेश साळगांवकर आणि जळगांव
जिल्ह्यातील जामनेरचे एकनाथ माळी या स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
भारत देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही देशाच्या
काही भुभागावर भारतीय तिरंगा फडकला नव्हता, त्याकरिता आंदोलने झाली. या
जनआंदोलनामध्ये काही लोक हुतात्मा झाले. काही स्वातंत्र्य सैनिक आजही हयात असून
समाज व देशाला मार्गदर्शन करीत आहेत. या स्वातंत्र्य सैनिकांचा यथोचित सन्मान
व्हावा म्हणून 2003 पासून
क्रांतिदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते दरवर्षी 9 ऑगस्टला देशाच्या विविध भागातील
स्वातंत्र्य सैनिकांना सन्मानीत करण्यात येते.
महाराष्ट्रातून सन्मानीत झालेले शेषराव बडवाइक हे
मुळचे अमरावती जिल्हयातील सावनेरचे. १९४२ साली महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली
देशभर ‘भारत छोडो
आंदोलन’ने जोर
पकडला. त्यावेळी १६ वर्षांच्या शेषराव बडवाइक यांनी या आंदोलनात उडी घेतली. ‘चरखा चला चला के लेंगे स्वराज लेंगे’ अशा घोषणा देत त्यांनी आपल्या मित्रांना या आंदोलनात
सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच, त्यांच्या शाळेचे शिक्षक फरकाडे गुरुजी
यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजी शिक्षणावर बहिष्कार टाकला. त्यांनी प्रभात फे-या
काढून अमरावती शहरात आणि आजुबाजुच्याभागात
‘भारत छोडो आंदोलनाचा’ प्रचार केला.अमरावतीमध्ये माजी केंद्रीय कृषीमंत्री
दिवंगत पंजाबराव देशमुख यांच्या
नेतृत्चाखाली झालेल्या आंदोलनात श्री. बडवाइक यांना अटक झाली आणि त्यांना १ वर्षाचा
तुरुंगवास भोगावा लागला.
मुळचे
अकोला जिल्हयातील उंबरडा(बाजार)चे
रहिवासी डॉ. शेषराव इंगोले यांनी नागपूर
येथे वैद्यकीय शिक्षण घेत असताना गोवा मुक्ती संग्रामात सहभाग घेतला. भारतदेश
स्वतंत्र झाला असला तरी गोवा, दिव आणि दमन अजूनही पोर्तुगिजांच्या जोखडात असल्याचे
दु:ख त्यांना सारखे सलत होते. नागपूरच्या रॉबर्टसन मेडिकल स्कुल मेयो हॉस्पीटलचे तत्कालीन मानद प्राध्यापक डॉ. आरपी द्विवेदी
यांच्या पुढाकाराने ‘गोवा मेडिकल मिशन नागपूर’ ची स्थापना झाली. डॉ. शेषराव इंगोले यांनी या
मिशनच्या झेंडयाखाली कोकणातील सावंतवाडी येथून आरोंदा, गार्डी टेंपल मार्गे गोव्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न
केला. पण, पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना रोखले व बेदम मारले. मग त्यांनी अरोंदा
येथे आरोग्य शिबीर उभारून गोवा मुक्ती आंदोलनात जखमी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांची
सुश्रृषा करण्याचे काम केले.
नांदेड
जिल्हयातील देगलूर येथील कृष्णराव देशपांडे यांनी हैद्राबाद मुक्ती संग्राम आणि
गोवा मुक्ती आंदोलनात मोलाचे योगदान दिले. भारत देश स्वातंत्र झाला तरी हैद्राबाद
हे निजामाच्या अधिपत्याखाली होते. स्वामी रामनंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली उभ्या
राहिलेल्या हैद्राबाद मुक्ती संग्रामात श्री. देशपांडे यांनी सहभाग घेतला. यावेळी
मराठवाडयातील देगलूर, बिलोली, मुखेड या परिसरात निजामा विरुध्द वातावरण तयार झाले
होते. त्यावेळी नांदेड जिल्हा संघटक म्हणून श्री. देशपांडे यांनी महत्वाची भूमिका
बजावली. हेद्राबाद मुक्ती संग्रामाला गती देण्यासाठी त्यांनी नाशिक जिल्हयातील येवला
येथे आपल्या सहका-यांसह सशस्त्र आंदोलनात सहभाग घेतला. मराठवाडयाच्या विकासाच्या
प्रश्नावर त्यांनी विविध मोर्च काढले आणि सत्याग्रहात भाग घेतला. १९५५ मध्ये श्री.
देशपांडे यांनी गोवा मुक्ती आंदोलनात सहभाग घेतला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी
त्यांनी तरूणांची मोठी फळी उभी केली.
जळगाव
जिल्हयातील जामनेर तालुक्यातील गणेशवाडी येथील एकनाथ माळी यांनी गोवा मुक्ती
आंदोलनात सहभाग घेतला. जनशक्ती वृत्तपत्राचे संपादक ब्रिजलाल पाटील यांच्या
प्रेरणेने श्री. माळी यांनी वयाच्या २५
व्या वर्षी या आंदोलनात उडी घेतली. सावंतवाडी येथे मोडक गुरूजींच्या
नेतृत्वाखाली ‘स्वतंत्रता
का मुल्य प्राण है..’ असे
प्रेरक गीत म्हणत त्यांनी मध्यरात्रीच गोवा राज्याच्या पेडने गावात प्रवेश केला.
मात्र, पोर्तुगीज पोलिसांनी त्यांना अडवले त्यांना बेदम मारले आणि गाडीत बसवून
महाराष्ट्राच्या हद्दीत परत सोडले. त्यांनी या भागात गोवा मुक्ती आंदोलनाला गती
देण्यासाठी जनजागृती केली.
गोव्यातील म्हापसा येथे जन्मलेले
आणि आता मुंबईत स्थायीक झालेले नागेश साळगांवकर यांनी वयाच्या १६ व्या वर्षीच गोवा मुक्ती आंदोलनात
सहभाग घेतला. म्हापसा हायस्कुल मधील विद्यार्थ्यांचे नेतृत्व करत ‘पोर्तुगीज गोवा छोडो’ अशा घोषणा देत त्यांनी विद्यार्थी आंदोलनाची धुरा सांभाळली.
त्यांच्या आंदोलनाचा वाढता प्रभाव पाहता १६ सप्टेंबर १९५४ मध्ये त्यांना आल्टीनो
येथे बंदीवान करण्यात आले. त्यांना ८ महीने बंदिवान ठेवण्यात आले. पीटर आलवारीस
यांच्या नेतृत्वाखालील ‘गोवा लिब्रेशन
आर्मीमध्ये’ सहभागी
होऊन श्री साळगांवकर यांनी ‘पोर्तुगीज चलेजाव आंदोलनात’ सहभाग घेतला. चौगुले कोळसा खान ध्वस्त करणे, पोर्तुगिजांची रसद
अडविणे अशा कारवायांमध्ये भाग घेतल्यामुळे त्यांना अटक करून मडगावच्या तुरुंगात
डांबण्यात आले यावेळी त्यांना ५ महिन्यांचा तुरूंगवास झाला.
आजच्या
कार्यक्रमात इतर राज्य तसेच केंद्रशासीत प्रदेशातील स्वातंत्र्य सेनानींचाही
सन्मान करण्यात आला.
000000
No comments:
Post a Comment