Monday, 5 September 2016

महाराष्ट्र सदनात गणरायाची प्रतिष्ठापणा : राजधानी दिल्लीतील विविध मराठी गणेश मंडळांतही गणरायांचे उत्साहात आगमन









नवी दिल्ली,नवी दिल्ली , 05 : महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या वतीने कोपरनिक्स मार्गस्थित महाराष्ट्र सदनात सोमवारी गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली. दिल्लीच्या वेगवेगळया भागातील विविध गणेश मंडळातही उत्साहाच्या वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापणा करण्यात आली.
              महाराष्ट्राच्या कानाकोप-यात आनंद व उत्साहाच्या वातावरणात साजरा होणारा गणेशोत्सव महाराष्ट्राबाहेर राजधानी दिल्लीतही उत्साहात साजरा करण्याची परंपरा आहे. महाराष्ट्र सदनात सार्वजनिक उत्सव समितिच्यावतीने आयोजित गणेशोत्सवात निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला आणि राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र यांनी गणरायाची सपत्निक पुजा केली. अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त अजितसिंह नेगी यांच्यासह दिल्लीस्थित महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी, प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठया संख्येन उपस्थित होते.
        तत्पूर्वी, आज सकाळी येथील कोपरनिक्स मार्गावर जल्लोषात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. “गणपती बाप्पा मोरया”, “मंगल मूर्ती मोरया” या घोषणा, ढोल ताशांचा गजर व अबीर गुलालाची उढळण यामुळे संपूर्ण वातावरणात भक्तीमय झाले. मिरवणुकीनंतर शासकीय पुजा, मंत्रोच्चार व श्रींची आरती होवून गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.       दिल्ली व राष्ट्रीय राजधानी परिक्षेत्रातील जवळपास ३६ मराठी गणेशोत्सव मंडळातही आज गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी शांततामय मार्गाने ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांच्या आगमनाचा जल्लोष करण्यात आला.
                                      परिचय केंद्राच्यावतीने गणेश मंडळांची एकत्रीत कार्यक्रम पत्रिका
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीतील विविध गणेश मंडळांच्या गणेशोत्सवातील कार्यक्रमांची एकत्रीत पत्रिका प्रकाशित करण्यात आली. त्यामुळे दिल्लीकर गणेश भक्तांना जवळच्या गणेश मंडळाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन गणेशोत्सवाचा आंनद घेता येणार आहे. गणेशोत्सवानिमित्त दिल्लीतील विविध गणेश मंडळांमधे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शण घडविणा-या वैविद्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment