नवी
दिल्ली, २२ : जलयुक्त
शिवार योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीतून राज्यात जलसंवर्धनाचे महत्वपूर्ण काम झाले असून
त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत,अशी माहिती राज्याचे वित्त व नियोजन आणि वने
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे दिली.
येथील बालभवनात जल जन जोडो अभियान,
एकता परिषद परमार्थ समाज संस्था आणि तरूण भारत संघ यांच्या संयुक्त विद्यमाने
आयोजित ‘निर, नारी, नदी संमेलनात’ श्री. मुनगंटीवार बोलत
होते. जगविख्यात जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यावेळी अध्यक्षस्थानी होते.
श्री. मुनगंटीवार म्हणाले, दुष्काळावर मात करण्यासाठी
राज्य शासनाने जलयुक्त शिवार योजना आखली. या योजनेअंतर्गत मृत जल साठयांचे पुनर्भरण
करण्यात आले. नाले, नद्या, विहीरी आदींचे खोलीकरण करण्यात आले. या योजनेला जनतेचा मोठा
सहभाग लाभला.योजनेच्या यशस्वीतेमुळे राज्यात जलसंवर्धनाचे मोठे काम झाले आहे. जलयुक्त
शिवारच्या जोडीला वन विभागाच्या वतीने राज्यात लावण्यात आलेले २ कोटी वृक्ष, जल
साक्षरता केंद्रांच्या माध्यमातून झालेले उत्तम कामे आणि नमामी केंद्र शासनाच्या गंगेच्या
धर्तीवर राज्यात सुरु असलेले नमामी चंद्रभागा अभियानाची माहिती त्यांनी यावेळी
दिली.
स्वच्छ पाणी व स्वच्छ हवा हा प्रत्येक नागरीकाचा
अधिकार आहे. कारखाने, उद्योग व अन्य माध्यमातून होत असलेले नदीच्या पाण्याचे
अशुध्दीकरण थांबविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. या कामात लोक सहभागाची मोठी
गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रपूर जिल्हयात ईराई नदीच्या शुध्दीकरणासाठी
शासन व लोक सहभागातून झालेल्या यशस्वी कामाची माहिती त्यांनी दिली. देशाच्या विविध
भागातील पिण्यासह अन्य उपयोगासाठी आवश्यक पान्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनासोबतच
जनतेने सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
डॉ. राजेंद्र सिंह यांनी
प्रास्ताविकात महाराष्ट्र शासनाच्यावतीने जल साठे पुनर्भरण आणि दुष्काळ
निवारणासाठी सुरु असलेल्या विविध कामांचे कौतुक केले. २२ आणि २३ सप्टेंबर २०१६
अशा दोन दिवस चालणा-या या संमेलनात जलसंरक्षणासाठी कार्य करीत असलेल्या देश-विदेशातील
३०० हून अधिक कार्यकर्त्यांनी भाग घेतला आहे.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात राज्यातील
कोकण भागात शासनाच्या सहकार्याने जगबुडी, गांधारी.जाणवली आणि अर्जुना या चार
नद्यांच्या पुनर्भरणाच्या यशस्वी कार्याबद्दल किशोर धारिया आणि संजय यादवराव यांनी
सादरीकरण केले. कोकणातील या नद्यांच्या पुनर्भरण कार्यक्रमातून १०० गावांचा पिण्याचा
पाण्याचा प्रश्न सुटला आहे. राज्य शासनाच्या समुह वन हक्क कार्यक्रमातून नंदूरबार, धुळे आणि जळगाव जिल्हयातील १०
गावांमध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु असलेल्या प्रकल्पाबाबत लोकसमन्वयक
प्रतिष्ठानच्या प्रमुख प्रतिभा शिंदे यांचे सादरीकरण झाले. सोलापूर जिल्हयातील
सांगोला तालुक्यात महोद-कासावाडा गावात लोक सहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांची
माहिती सरपंच बाळासाहेब डहाळे यांनी दिली.
0000
No comments:
Post a Comment