Friday, 14 October 2016

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय कॅबीनेटकडे : श्री. गिरीश बापट



                                                              नवी दिल्ली, १४ : पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय कॅबीनेटकडे पाठविण्यात आला आहे ,अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण मंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री गिरीष बापट यांनी  दिली.
            पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासंदर्भात आज केंद्रीय अर्थमंत्रालयात श्री. बापट यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि केंद्रीय अर्थ सचिव अशोक लवासा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्डच्या(पीआयबी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबैठकीस केंद्रीय नगर विकास मंत्रालयाचे सचिव राजीव गौबा, राज्याच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पुणे महानगर पालिकेचे आयुक्त कुणाल कुमार आणि महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र उपस्थित होते.           
महाराष्ट्र सदनात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. बापट यांनी या निर्णया विषयी माहिती दिली. ते म्हणाले, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्डने पुणे मेट्रो प्रकल्पाला दिलेल्या आजच्या मंजुरीमुळे पुणे शहाराच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल पडले आहे. शहरात मोठया प्रमाणात असलेली वाहनांची संख्या, वाहतुकीसाठी खर्च होणारा जनतेचा बहुमूल्य वेळ या सारख्या समस्यांपासून पुण्यातील जनेतेची सुटका होणार आहे.
                                  पुणे मेट्रो प्रकल्पासाठी असा उभारणार निधी   
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात १२ हजार २९८ कोटी रूपये खर्च येणार आहे. केंद्र आणि राज्य शासन यातील प्रत्येकी २० टक्के निधी देणार आहे. यानुसार केंद्र शासन २ हजार ११८ कोटी तर राज्य शासन २ हजार ४३० कोटींचा निधी देणार आहे. सुमारे १ हजार २७८ कोटींचा एकूण १० टक्के निधी हा पुणे आणि पिंपरी –चिंचवड महानगर पालिका उभारणार आहेत. उर्वरीत ६ हजार ३०५ कोटींचा ५०  टक्के एवढा निधी कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार असल्याचे श्री. बापट यांनी सांगितले.  
                                    अशी  धावणार पुणे मेट्रो
पुणे मेट्रोचे २ कॉरीडॉर असणार आहेत. कॉरीडॉर-१ हा पिंपरी -चिंचवड ते स्वारगेट असा १६.६  कि.मी चा असणार आहे. यातील ५ कि.मी अंतर हे भुयारी असेल आणि या मार्गावर एकूण १५ स्टेशन्स असतील. कॉरीडॉर-२ हा  कोथरूड भागातील वनज येथून एरवडा भागातील रामवाडी पर्यंत १४.७ कि.मी. अंतराचा असेल. या मार्गावर एकूण १६ स्टेशन्स असणार आहेत. कॉरीडॉर-२ चा पूर्ण मार्ग जमीनीवरून असेल.  
पुणे शहराची वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवर वाढती वाहनांची संख्या लक्षात घेता वाहतुकीचा तान कमी करून जनतेला उत्तम परिवहन व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पुणे मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव पुढे आला. पुणे व पिंपरी चिंचवड या महानगर पालिकांच्या मंजुरी नंतर राज्य व केंद्र शासनाने या प्रकल्पास मंजुरी दिली. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी)ने पुणे मेट्रोचा सवीस्तर प्रकल्प अहवाल  तयार करून मेट्रोचे २ कॉरीडॉर शहरासाठी प्रस्तावीत केले असून त्यास मान्यता मिळाली. 
पालकमंत्री गिरीष बापट यांच्या अध्यक्षतेखाली पुणे मेट्रोसाठी उपसमिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या समन्वयातून व लोक प्रतिनिधी, सामाजिक संस्था यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे समाधान करून राज्य शासनाने विविध मंजुरींसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला. त्यानुसार गेल्या वर्ष  भरात जवळपास सर्वच संबंधित विभागांकडून मंजुरी मिळाली आहे.    
                श्री. बापट यांनी मानले पंतप्रधानांचे आभार  
केंद्र शासनाच्या आजच्या निर्णयासाठी श्री. बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, खासदार अनिल शिरोळे, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिकांचे महापौर आणि आयुक्त यांच्यासह या प्रकल्पासाठी सहयोग देणा-या सर्वांचे आभार मानले.

                                                      *********

No comments:

Post a Comment