दिल्लीत ‘वाचन प्रेरणा
दिन’ साजरा
नवी दिल्ली, १५ : विविध भाषांतील
उत्तमोत्तम साहित्य वाचनाने आपले जीवन समृध्द करा असा संदेश लेखक लक्ष्मण राव
यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित ‘वाचन प्रेरणा दिनी’ दिला.
भारताचे दिवंगत
राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज ‘वाचन
प्रेरणा दिन’ म्हणून महाराष्ट्रभर साजरी होत आहे. या
निमित्ताने परिचय केंद्रात लेखक लक्ष्मण राव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले
होते. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश
कुलकर्णी,परिचय केंद्राचे अधिकारी–कर्मचारी आणि परिचय केंद्राला भेट देणारे पाहुणे
यावेळी उपस्थित होते.
लक्ष्मण राव म्हणाले,
प्रत्येक भाषा ही त्या-त्या प्रांताची
कला, संस्कृती अशा विभिन्न गुणांनी संपन्न असते.भारत देशात विविध राज्यांमध्ये
प्रंचड साहित्य संपदा निर्माण झाली आहे. विदेशातही मोठया प्रमाणात उत्तम साहित्य
निर्मिती झाली आहे. या भाषांमधील साहित्याने वाचक
समृध्द होऊ शकतो त्यासाठी बहु भाषी वाचन झाले पाहिजे. स्वानुभव कथन करताना लक्ष्मण
राव यांनी लेखक बनन्यासाठी महाराष्ट्रातील अमरावती जिल्हयातील तडेगांव(दशासर) या छोटयाशा गावातून येऊन दिल्लीत
टाकलेले पाऊल आणि या सर्व प्रवासात हिंदी सह विविध भाषांतील अनुवादीत वाचनाने
मिळालेली प्रेरणा याबद्दल माहिती दिली. उदर निर्वाहासाठी दिल्लीतील आयटीओ
परिसरातील हिंदी भवना शेजारी चहाची टपरी मांडून वाचन व लेखनाच्या छंदामुळे त्यांनी
आपल्यातील लेखक फुलवला. आजपर्यंत त्यांनी ३५ पेक्षा जास्त पुस्तक लिहीली त्यातील
२४ प्रकाशित झाली तर बहुतेक पुस्तकांच्या आवृत्याही निघाल्या. ते स्वत: लेखक,
प्रकाशक आणि विक्रेते आहेत. कादंबरी, नाटक, ललीत लेखन अशा प्रांतात लक्ष्मण राव हे
हिंदीतील महान लेखक गुल्शन नंदा बनन्याच्या उद्देशाने वाचनाकडे वळले आणि एक लेखक झाल्याचे त्यांनी सांगितले. वाचन कलेसह
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या आयुष्यातील प्रसंगांवरही लक्ष्मण राव यांनी
यावेळी प्रकाश टाकला.
श्री. कांबळे
यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र शासनाने माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल
कलाम यांच्या जयंती निमित्त सुरु केलेल्या ‘वाचन प्रेरणा दिना’ विषयी माहिती दिली. तसेच त्यांनी यावेळी डॉ. कलाम यांच्या बहुआयामी
व्यक्तीमत्वाचे पैलू उलगडून सांगितले.
श्री. कुलकर्णी
यांनी वाचनाचे महत्व विषद करताना देश-विदेशातील
विविध योध्दे व महापुरुषांचे दाखले दिले, तसेच डॉ. कलाम यांच्या योगदाना बद्दल
उपस्थितांना मार्गदर्शन केले. उपसंपादक रितेश भुयार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन
केले.
याकार्यक्रमात माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.
अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.यावेळी कार्यालयात उपस्थित कर्मचा-यांनी
प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी परिचय केंद्राच्या ग्रंथालयात
पुस्तक प्रदर्शनाचेआयोजन करण्यात आले.
महाराष्ट्र
सदनात डॉ. कलाम यांना अभिवादन
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात
निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांनी डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर
निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त भारती झाडे, संजय आघाव, यांच्यासह महाराष्ट्र
सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित
अधिकारी कर्मचा-यांनीही यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
000000
No comments:
Post a Comment