Wednesday, 19 October 2016

महाराष्ट्राचा पाणी वाटा कायम ; कृष्णा पाणी वाटप लवादाचा आदेश


           
नवी दिल्ली दि. 19 : कृष्णा नदी पाणी वाटपाबाबत महाराष्ट्राच्या वाटयाला येणारे ६६६ टिएमसी पाणी कायम राहणार असल्याचे आज कृष्णा पाणी वाटप लवादाने आपल्या आदेशात स्पष्ट केले.  
भिकाजी कामा प्लेस येथील कृष्णा पाणी वाटप लवादाच्या मुख्यालयात आज हा निर्णय झाला. गेल्या २ वर्षांपासून या विषयावर सुनवणी सुरू आहे. या प्रकरणात निर्णय देताना लवादाचे अध्यक्ष न्या. ब्रिजेश कुमार आणि सदस्य न्या. बी.पी.दास, न्या. राम मोहन रेड्डी यांनी कृष्णा नदीच्या पाणी वाटपाबाबत महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगण राज्याचे प्रकल्प निहाय पाणी वाटप पुन्हा करण्यात यावे ही आंध्रप्रदेश आणि तेलंगण राज्याची मागणी  फेटाळून लावली. तसेच, उभय राज्यांच्या वाटयाला आलेल्या १००५ टीएमसी पाणी  वाटपाबाबत  १४ डिसेंबर २०१६ रोजी लवाद  म्हणने ऐकूण घेईल असे लवादाने आपल्या निर्णयात स्पष्ट केले .  
आजच्या निर्णयात कलम ८९ च्या आंध्रप्रदेश राज्य निर्मिती कायदा २०१४ नुसार पाणी वाटपाबाबत निकाल झाला. त्यानुसार  आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये पाणी वाटपाचा निर्णय घेण्यासंदर्भात पुढील आदेश पारीत करण्यात आले. आंध्रप्रदेश निर्मिती कायदा हा महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांना लागू नसल्याने या राज्यांच्या वाटयाचे पाणी कायम ठेवण्याची भूमिका उभय राज्यांच्यावतीने मांडण्यात आली. ही बाजू मान्य करत लवादाने महाराष्ट्र व कर्नाटक  राज्यांच्या वाटयाचे पाणी कायम राहणार असेही आजच्या निर्णयात स्पष्ट केले.  
    महाराष्ट्र शासनाच्यावतीने सरकारी वकील दीपक नारगोलकर यांनी बाजू मांडली.

0000000

No comments:

Post a Comment