Wednesday, 26 October 2016

महाराष्ट्रातील आदिवासी कलाकारांसाठी ‘आदिवासी कार्नीव्हल’ उत्तम संधी ; विष्णू सावरा







नवी दिल्ली, दि. 26 : महाराष्ट्रातील आदिवासी हस्तकलाकार आणि लोककलाकारांसाठी राष्ट्रीय आदिवासी कार्नीव्हल उत्तम संधी असल्याचे मत राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी व्यक्त केले.
            प्रगती मैदान येथे  केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय आदिवासी कार्नीव्हलमध्ये महाराष्ट्र हस्तकला दालनाचे उदघाटन श्री. सावरा यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. श्री. सावरा यांनी महाराष्ट्र दालनात लावण्यात आलेल्या आदिवासी हस्तकला स्टॉल्सची पाहणी केली. यानंतर श्री. सावरा यांनी सांगितले, कार्नीव्हल मध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील हस्तकलाकार व लोककलाकारांनी मोठया संख्येत सहभाग नोंदवला आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील या कलाकारांना उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
देशभरातील आदिवासी बांधवांची हस्तकला आणि लोककला यांचा अनोखा संगम या निमित्ताने दिसून येतो. विविध राज्यांतील आदिवासी बांधवांच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीतून देशाच्या एकत्मतेची वीण आणखी घट्ट होण्यास या कार्नीव्हलचा उपयोग होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातून आलेल्या आदिवासी हस्तकलाकार आणि लोककलाकारांना श्री. सावरा यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.     
            तत्पूर्वी, या कार्नीव्हल मध्ये सकाळच्या सत्रात केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जिओल ओराम यांच्या अध्यक्षतेत पेसा कायदा आणि आदिवासी कल्याण विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले. श्री.  विष्णू सावरा यावेळी उपस्थित होते. विविध राज्यांचे आदिवासी विकास मंत्रीही यावेळी उपस्थित होते.
            राष्ट्रीय आदिवासी कार्नीव्हल मध्ये महाराष्ट्र दालनात राज्यातील ८ स्टॉल्स उभारण्यात आले असून आदिवासी बांधवांनी तयार केलेली काष्ठशिल्प, वारली पेंटींग, वनौषधी येथे प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्हयातील सुरगना तालुक्यातील कारंजली येथील ३० आदिवासी कलाकर आणि भंडारा जिल्हयातील तुमसर तालुक्यातील चिखली येथील २५ आदिवासी लोककलाकारांनी या कार्नीव्हलमध्ये सहभाग घेतला असून हे कलाकार लोकनृत्याचे सादरीकरण करीत आहेत. श्री. सावरा यांनी या  कलाकारांच्या सादरी करणाचे कौतुक केले.
            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय आदिवासी कार्नीव्हलचे मंगळवारी उदघाटन झाले. दिनांक २६ ते २८ ऑक्टोबर २०१६ पर्यंत प्रगती मैदान येथील हॉल क्रमांक ७ मध्ये दररोज सकाळी १० ते रात्री ८.३० पर्यंत हा कार्नीव्हल जनतेसाठी खुला राहणार आहे.
                                                         0000000


No comments:

Post a Comment