Saturday, 29 October 2016

दिल्लीत साजरी झाली सुरेल ‘दिवाळी पहाट’






नवी दिल्ली, दि. 29 : प्रसिध्द गायक महेश काळे यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाच्या सुरेल मैफिलीने येथील इंडिया गेट लॉन्सवर दिवाळी पहाट कार्यक्रम झाला. राजधानीत प्रथमच दिवाळी पहाट कार्यक्रम साजरा होत असल्याने हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला . 
            विविध क्षेत्रात कार्यरत दिल्लीकर मराठी माणसांना एकत्र आणत दिवाळीची सुरेल भेट देण्यासाठी दिल्ली मराठी प्रतिष्ठान या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार डॉ. नरेंद्र जाधव आणि खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांच्यासह गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते. प्रसिध्द अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.               
          ल्युटीयन झोन म्हणून एक वेगळी ओळख असणारा इंडिया गेट परिसर आज पहाटेपासूनच मराठ मोळया संस्कृतीने नटलेला दिसत होता. पणत्या, रांगोळया आणि मोठया कमानी यांनी  इंडिया गेट लॉन्सचा परिसर सजला होता. पहाटेची निरव शांतता राजधानीत प्रथमच पडलेलं धुक आणि  हलकी थंडीची लाट अशात सुरेल गळयाचे प्रसिध्द गायक महेश काळे यांच्या सुस्वरांनी येथील वातावरण उपस्थितांना परमोच्च आनंद देत होता. सकाळी ६.३० वाजता मैफिलीला सुरुवात झाली. 
            मैफिलीच्या पूर्व रंगात कृष्ण आणि पांडुरंगयांच्या व्यक्तित्वाच्या छटा दर्शविणा-या गीतांची उधळन आणि उत्तर रंगात नाटयगीत,भावगीत,अभंग अशा सुरावटींचे सादरीकरण उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेले.    शितल चलत पवन यारी या शास्त्रीय संगिताने नटलेल्या गीताने मैफिलीची सुरुवात झाली. अलबेला सजन आयो रे, कटयार काळजात घुसली चित्रपटातील सूर निरागस हो, माझे जीवन गाने या अविट गितांनी मैफिलीत रंग भरला.  महेश काळे यांनी  शास्त्रीय गायनाच्या अंगाने सादर केलेले बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, अवघे गरजे पंढरपूर’, कानडा राजा पंढरीचा, अबीर गुलाल उधळीत रंगया सुरावटींना उपस्थितांनी टाळयांच्या गजरात प्रतिसाद दिला. 
              कार्यक्रमाच्या मध्यंतरात खासदार डॉ. नरेंद्र जाधव आणि खासदार विनय सहस्त्रबुध्दे यांच्या हस्ते गायक महेश काळे आणि निवेदिका सोनाली कुलकर्णी यांच्यासह वादयवृंदांचे स्वागत करण्यात आले. 
            मैफिलीच्या उत्तर रंगाची सुरुवात घेई छंद मकरंद या नाटयगिताने  झाली. यानंतर विविध भावगीत, आणि अभंग सादर झाली. कटयार काळजात घुसली चित्रपटातील अरूण किरण गगन चमकेया गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. जवळपास साडेचार तास हा कार्यक्रम चालला. 
            या कार्यक्रमास दिल्लीत कार्यरत विविध क्षेत्रातील मराठी व्यक्ती मोठया संख्येने उपस्थित होते.                      
                                                                 ००००००



         

No comments:

Post a Comment