Monday, 3 October 2016

राज्यातील जनावरांचा विमा उतरविणार : महादेव जानकर








                                                                                                           
नवी दिल्ली, ०३ : राज्यातील प्रत्येक जनावराचा विमा उतरविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशु संवर्धन, दुग्ध आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर यांनी दिली. दुष्काळग्रस्त भागातील गावांमध्ये दुग्ध विकास कार्यक्रम राबवणार असून याअंतर्गत प्रत्येक गावाला दीड कोटींचा निधी उपलब्ध करून देणास असल्याचेही त्यांनी सांगितले.  
            मंत्रीपद स्वीकारल्यानंतर श्री. जानकर यांनी प्रथमच महाराष्ट्र परिचय केंद्राला आज भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चे दरम्यान त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. जानकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार आणि दैनिक केसरीचे दिल्ली प्रतिनिधी कमलेश गायकवाड यावेळी उपस्थित होते.
            श्री. जानकर म्हणाले, राज्यातील  प्रत्येक जनावरांचा विमा उतरविण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे.  या अंतर्गत गायी ,म्हशी, शेळी, मेंढी, घोडे, आदी जनावरांचा विमा काढून आतापर्यंत राज्यातील शेतक-यांना साडे आठ कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे.शेतक-यांना आर्थिक पाठबळ देणारा कृषी पूरक व्यवसाय म्हणून पशु पालन महत्वाचे आहे. यासाठी राज्यातील सर्व शेतक-यांनी उतरवावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.  
विदर्भ व मराठवाडयातील दुष्काळग्रस्त ११ जिल्हयातील २ हजारांहून अधिक गावांमध्ये दुग्ध विकास कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाच्या सहकार्याने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गंत प्रत्येक गावाला दीड कोटींचा निधी देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रभावी अमंलबजावणीतून शेतक-यांना आर्थिकदृष्टया सक्षम बनविण्यासाठी ही योजना आखली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील वर्षी आणखी २ हजार गांवाचा या कार्यक्रमात समावेश करण्यात येणार असल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले.
            मत्स्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून झारखंड राज्याच्या धर्तीवर राज्यात केज कल्चर विकसीत करणार असल्याचे  श्री. जानकर यांनी सांगितले.  गोडया व खा-या पाण्यातील मासेमारींचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला असून या माध्यमातून मत्स्य व्यवसाय क्षेत्रात मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.              
              मागेल त्याला शेततळे या राज्य शासनाच्या कार्यक्रमाला जोडून शेतक-यांना मत्सबीज उत्पादनाच्या माध्यमातून उत्पन्न मिळवून देण्याची योजना आखण्यात आल्याचे श्री. जानकर यांनी सांगितले. या कार्यक्रमांतर्गत शेतक-यांना मोफत मत्स्यबीज उपलब्ध करून देण्यात येणार असून यातून मिळणा-या उत्पन्नातून शेतक-यांना मोठया प्रमाणात आर्थिक पाठबळ ‍मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
            राज्यातील आजारी जनावरांचा वेळेत व योग्य उपचार व्हावा म्हणून गावा-गावांमध्ये मोबाईल अँबुलंस सुरु करण्यात  येणार असून मंत्रालयातून त्यावर देखरेख ठेवण्यात येणार आहे. जनावरांसाठी मुक्त गोठा पध्दत राबविण्याबाबत विचार सुरु आहे. विविध कार्यक्रम व योजनांची प्रभावी अमंल बजावणी करून पशु संवर्धन, दुग्ध आणि मत्स्य विकास विभाला मानाचे स्थान मिळवून देणार असा विश्वास श्री. जानकर यांनी यावेळी व्यक्त केला.     
                                                                     ***********


No comments:

Post a Comment