नवी
दिल्ली, दि. 10 : पालघर जिल्हयात
उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ‘वारली हाट’ या संग्रहालयाच्या माध्यमातून जगाला
आदिवासींच्या समृध्द संस्कृतीची ओळख होणार असल्याचा विश्वास आदिवासी विकास
मंत्री विष्णु सवरा यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केला. पेसा
कायद्याअंतर्गत राज्यातील आदिवासी ग्रामपंचायतींच्या खात्यात थेट २५८ कोटींचा निधी
उपलब्ध करून देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
श्री. सवरा यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी
झालेल्या अनौपचारीक चर्चेत त्यांनी ही माहिती दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक
दयानंद कांबळे यांनी श्री. सवरा यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माहिती
अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, उपसंपादक रितेश भुयार यावेळी उपस्थित होते.
श्री. सवरा
म्हणाले, पालघर जिल्हयातील मनोर येथे ६ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘वारली हाट’ संग्रहालय उभारण्याचे काम सुरु आहे.
लवकरच या हाटचे काम पूर्ण होईल. या हाटच्या माध्यमातून राज्यातील ४५ आदिवासी
जमातींची वैविध्यपूर्ण संस्कृती ,जीवनशैली प्रदर्शीत करण्यात येणार असल्याचे
त्यांनी सांगितले. आदिवासी कलाकारांना हक्काची बाजारपेठही या हाटच्या माध्यमातून उपलब्ध
होणार असल्याचे त्यांनी सांगितले. पेसा कायद्याअंतर्गत राज्यातील २ हजार ८३५
आदिवासी ग्रामपंचायतींच्या खात्यात थेट २५८ कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला
आहे. यामुळे आदिवासी भागांच्या विकासाला गती मिळाल्याचे ते म्हणाले.
आदिवासी मुला-मुलींसाठी शिक्षणामुळेच
विकासाची दारे उघडी होणार आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी राज्यशासन
भक्कमरित्या पाठीशी उभे असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणाच्या माध्यमातून
राज्यशासनाच्या कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभही आदिवासी तरूण-तरुणींना होणार आहे.
राज्य शासनाने याकामी पुढाकार घेतला आहे. आदिवासी वसतीगृहात जागेअभावी प्रवेश मिळू
न शकलेल्या मुला-मुलींसाठी खाजगी
वसतीगृहात व भाडयाच्या खोल्यांमध्ये राहण्याची मुभा देण्यात आली आहे. याकाळात
विद्यार्थ्यांच्या निवास व जेवन, नाष्टा, शैक्षणिक साहित्य खरेदी आदींवर होणारा
खर्च राज्य शासन करणार आहे. यासंदर्भात नुकताच कॅबीनेटमध्ये निर्णय घेण्यात
आल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण पुरविण्यासाठी या
विद्यार्थ्यांना नामांकीत शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो व संपूर्ण खर्च आदिवासी विभागाकडून देण्यात येतो. श्री.सवरा यांनी यावेळी आदिवासी
विभागाच्यावतीने राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती
दिली.
यावेळी परिचय
केंद्राचे उपसंचालक श्री.कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय
केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात
येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची
माहिती श्री. सवरा यांना दिली. श्री. सवरा यांना यावेळी महाराष्ट्र परिचय
केंद्राची प्रकाशने आणि ‘लोकराज्य’ व ‘महाराष्ट्र अहेड’ ची अंक भेट स्वरूपात देण्यात आली.
परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. सवरा
यांनी माहिती जाणून घेतली. श्री. सवरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामा
बद्दल समाधान व्यक्त केले.
0000000
No comments:
Post a Comment