Friday, 11 November 2016

आंतरराष्ट्रीय व्यापार मेळयात ‘डिजीटल महाराष्ट्र’


                  
नवी दिल्ली, दि. 11 : प्रगती मैदान येथे दिनांक १४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान आयोजित ३६ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्या (आयआयटीएफ) मध्ये महाराष्ट्र शासनाच्यावतीने डिजीटल महाराष्ट्रदालन उभारण्यात येत आहे.       राज्याची वनसंपदा, पर्यटन व उद्योग क्षेत्रातील प्रगती आदींचे डिजीटल व व्हर्च्युअल स्वरूपातील दर्शन या ठिकाणी भेट देणा-या देश- विदेशातील ग्राहक व जनतेला घडणार आहे. राज्यातील लघु उद्योगांचे ८० स्टॉल्स विक्री व प्रदर्शनासाठी लावण्यात येत आहेत. महाराष्ट्राची समृध्द परंपरा दर्शविणा-या वैविद्यपूर्ण कार्यक्रमांची येथे रेलचेल असणार आहे.           
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत भारत व्यापार संवर्धन संघटनेच्या’(आयटीपीओ) वतीने दरवर्षी १४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान प्रगती मैदान येथे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी ३६ व्या आंतरराष्ट्रीय मेळाव्याची संकल्पना डिजीटल इंडीया असून २४ देश, भारतातील २७ राज्य आणि ४ केंद्र शासीत प्रदेश सहभागी होत आहेत. महाराष्ट्राच्यावतीने डिजीटल महाराष्ट्र संकल्पनेवर आधारीत दालन उभारण्यात येत आहे.            
महाराष्ट्र दालनाच्या तळ मजल्यावर राज्याचा उद्योग, वन संपदा व पर्यटनाची माहिती दर्शविणारे डिजीटल व व्हर्च्युअल प्रर्शन लावण्यात येत आहे. तसेच, विविध हस्त कलांचे प्रात्याक्षिक येथे उपलब्ध करून देण्यात येत आहे. दालनाच्या पहील्या मजल्यावर महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळ, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, सीडको, सीकॉम आदी उपक्रमांची माहिती देणारे स्टॉल्स उभारण्यात आली आहेत. राज्याच्या विविध भागांतील  हस्तकला आणि लघु उद्योजकांचे ८० स्टॉल्स येथे विक्री व प्रदर्शनासाठी लावण्यात येणार आहेत. या दालनात राज्यातील जवळपास १८० हस्तकलाकार व लघुउद्योजक सहभागी होणार आहेत.  
                              मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र दालनाचे उदघाटन  
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिनांक १४ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता महाराष्ट्र दालनाचे उदघाटन होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई राहणार आहेत. उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
                                      सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
        महाराष्ट्र दालनात व दालनाबाहेर महाराष्ट्राची समृध्द संस्कृती दर्शविणा-या कार्यक्रमांची  रेलचेल राहणार आहे . महाराष्ट्र दालनाच्या तळमजल्यावर सनई चौघडयाच्या मधुर सुरवाटींद्वारे दालनाला भेट देणा-या देश विदेशातील ग्राहक व जनतेचे स्वागत करण्यात येणार आहे. दालनाच्या पुढील मोकळया जागेत प्रसिध्द लोकवाद्य तुतारी पथक, लेझीम आदि वाद्यांद्वारे मराठी वाद्य संस्कृतीचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. दांडपट्टा, राज्यातील शाबास इंडिया पथक तलवारबाजीसह शारीरिक कसरतींचे प्रात्याक्षीकांचे सादरीकरण करणार आहेत.  
                            २६ नोव्हेंबरला साजरा होणार महाराष्ट्र दिन
            प्रगती मैदानच्या लाल चौक थिएटर मध्ये २६ नोव्हेंबर ला सायं ५.३० वाजता महाराष्ट्र दिन कार्यक्रम सादर होणार आहे. कलारंजन सांस्कृतीक ग्रुपचे ३४ कलाकार या कार्यक्रमात महाराष्ट्राची वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडविणार आहेत. लाल चौक येथे प्रत्येक दिवशी वेगवेगळया राज्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
            यावर्षीच्या भारत आंतरराष्ट्रीय मेळाव्यात देश-विदेशातील ७००० कंपनी सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिकेसह २४ देशांच्या एकूण २४० कंपन्यांचे उत्पादन येथे विक्री व प्रदर्शनासाठी असणार आहेत. डिजीटल इंडिया ही  मेळाव्याची मुख्य संकल्पना असून दक्षिण कोरिया हा मेळाव्याचा भागीदार देश आहे. बेलारूस हा फोकस देश आहे. हरियाणा हे फोकस राज्य असून मध्यप्रदेश आणि झारखंड ही भागीदार राज्य आहेत. दिनांक १४ ते १८ नोव्हेंबर पर्यंत केवळ व्यापारी वर्गासाठी हा मेळावा खुला राहणार आहे. १९ नोव्हेंबर पासून सर्वसामान्य जनतेसाठी मेळावा खुला होईल. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत या मेळाव्यात प्रवेश मिळणार आहे.         
                                                       0000000


No comments:

Post a Comment