नवी
दिल्ली, दि. १६ : नागपूर
मेट्रो प्रकल्पाला फ्रान्स बँकेकडून ९७५
कोटी रूपयांचे कर्ज मिळणार आहे, यासंदर्भात १७ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग, फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) बँक आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांच्यात करार होत आहे.
येथील नॉर्थब्लॉकस्थित केंद्रीय आर्थिक व्यवहार
विभागाच्या कार्यालयात दुपारी ४.०० वाजता केंद्र शासनाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे
सहसचिव सेल्वा कुमार, भारतातील फ्रान्सचे राजदूत अलेक्झेंडर झिग्लर, एएफडी बँक समुहाचे
दक्षिण आशिया विभागाचे संचालक निकोलस फॉरेंज आणि नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन
लिमीटेड(एनएमआरसीएल)चे
व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या उपस्थितीत हा करार होणार आहे. करारानुसार
नागपूर मेट्रोच्या कामांसाठी एएफडी बँक २० वर्ष मुदतीसाठी ९७५ कोटी रूपये(१३० मिलीयन
युरो) कर्ज स्वरूपात देणार आहे. कर्ज रूपाने उपलब्ध होणा-या रकमेतून
नागपूर मेट्रोचे सिग्नलींग, टेली कॉम, ऑटोमॅटीक फेअर कलेक्शन सिस्टिम(एएफसी), लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा आदी कामे
करण्यात येणार आहेत.
केंद्र सरकार आणि एएफडी बँके दरम्यान होणा-या
करारानंतर नागपूर मेट्राचे या करारासंदर्भातील प्रत्यक्ष काम सुरू होण्याआधी
नागपूर मेट्रोरेल कॉर्पोरेशन लिमीटेड आणि एएफडी बँके दरम्यान नागपूर येथे प्रकल्प
करार होणार आहे. महाराष्ट्र शासन,केंद्रीय नगर विकास मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या
आर्थिक व्यवहार विभागाच्या महत्वपूर्ण सहकार्याने एएफडी बँक समुहाकडून हे कर्ज
उपलब्ध झाले आहे.
याआधी,
१ एप्रिल २०१६ ला नागपूर मेट्रो
प्रकल्पासाठी जर्मनीची केएफडब्ल्यु बँक आणि केंद्रसरकार यांच्यात ३ हजार ७५० कोटी
रूपयांचा करार झाला आहे.
00000000
No comments:
Post a Comment