नवी दिल्ली, दि. १७: नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग आणि फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) बँक यांच्यात आज ९७५ कोटींचा करार झाला .
नॉर्थ ब्लॉकस्थित केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत केंद्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे सह सचिव एस.सेल्वा कुमार, भारतातील फ्रान्सचे राजदूत अलेक्झेंडर झिग्लर आणि एएफडी बँक समुहाचे दक्षिण आशिया विभागाचे संचालक निकोलस फॉरेंज यांनी करारावर स्वाक्ष-या केल्या. केंद्रीय नगर विकास विभाग मंत्रालयाच्या मेट्रो रेल प्रकल्प विभागाचे संचालक जनार्दन प्रसाद, नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेड(एनएमआरसीएल)चे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
अलेक्झेंडर झिग्लर यावेळी म्हणाले, नागपूर मेट्रोला निधी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत असून मेट्रोच्या प्रत्यक्ष परिचलनामुळे शहराची वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. फ्रान्स देश वातावरण बदलाचा पक्षधर असून नागपूर मेट्रोचे बहुतांश परिचलन हे सौर उर्जेवर चालणार असल्याने आमची पसंती नागपूर मेट्रोला राहीली आहे. नागपूर मेट्रोच्या कामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. या आधी बेंगलुरू आणि कोची मेट्रोसाठी फ्रान्सने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. आजच्या करारामुळे भारत आणि फ्रान्स दरम्यान संबंध दृढ होण्यास मदत होणार असल्याचे झिग्लर म्हणाले.
ब्रिजेश दीक्षित म्हणाले,आजच्या करारामुळे फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी बँकेंकडून नागपूर मेट्रोच्या महत्वाच्या कामांसाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग प्रशस्थ झाला. यामुळे मेट्रोच्या कामाला गती येणार असून प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर मेट्रोचे काम प्रगती पथावर असून आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले आहे. नागपूर मेट्रो रेल्वेच्या परिचलनासाठी एकूण विजेच्या २/३ वीज ही सौर उर्जेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहे. अशा पध्दतीचा भारतातील हा पहीला मेट्रो रेल प्रकल्प असणार आहे यामाध्यमातून मोठया प्रमाणात उर्जेची बचत होणार आहे. नागपूर मेट्रोसाठी जागतिक स्तरावरील उत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली असल्याचे श्री. दीक्षित म्हणाले.आजच्या करारासाठी त्यांनी महाराष्ट्र शासन,केंद्रीय नगर विकास मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभाग आणि एएफडी बँक समुहाचे त्यांनी आभार मानले.
करारानुसार नागपूर मेट्रोच्या कामांसाठी एएफडी बँक २० वर्ष मुदतीसाठी ९७५ कोटी रूपये(१३० मिलीयन युरो) कर्ज स्वरूपात देणार आहे. कर्ज रूपाने उपलब्ध होणा-या रकमेतून नागपूर मेट्रोचे सिग्नलींग, टेली कॉम, ऑटोमॅटीक फेअर कलेक्शन सिस्टिम(एएफसी), लिफ्ट आणि एस्केलेटर सुविधा आदी कामे करण्यात येणार आहेत.
नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमीटेड आणि केएफडब्ल्यु बँक यांच्या दरम्यान प्रकल्प करार होणार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. कराराचे स्थळ व तारिख येत्या लकवरच निश्चित होणार असल्याचे श्री ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
याआधी, १ एप्रिल २०१६ ला नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी जर्मनीची केएफडब्ल्यु बँक आणि केंद्रसरकार यांच्यात ३ हजार ७५० कोटी रूपयांचा करार झाला आहे.
No comments:
Post a Comment