Friday, 2 December 2016

महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळासह राज्यातील संस्था व व्यक्तींचा राष्ट्रीय सन्मान

 नवी दिल्ली, दि.२ : दिव्यांगांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळासह राज्यातील ७ व्यक्ती व ४ संस्थांचा राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते शनिवारी,            ३ डिसेंबर ला राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
            केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे औचित्य साधून विज्ञान भवनात राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिव्यांगांसाठी कार्यकरणा-या देशातील संस्था व व्यक्तींना १४ श्रेणींमध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्र्यासह राज्याच्यावतीने  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले या कार्यक्रमास उपस्थित  राहणार आहेत .         
दिव्यांगांच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी देशातील सर्वोत्कृष्ट राज्य प्राधिकृत वाहिनीचा राष्ट्रीय पुरस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाला प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय अल्प दृष्टी प्रकारात लातूर जिल्हयातील अहमदपूर येथील गजानन बेलाले यांना पुरस्काराने सन्मानीत करण्यात येणार आहे. नागपूर येथील डॉ. महंमद इर्फानूर रहीम यांना चलन वलन विषय दिव्यांगांच्या श्रेणीत तर नागपूरच्याच राधा बोरडे इखनकर यांना सर्वोत्तम गैर व्यवसायिक श्रेणीमध्ये सन्मानीत करण्यात येणार आहे. बहु दिव्यांग श्रेणीमध्ये पुणे येथील निशाद शहा तर पुण्याच्याच अश्विनी मेलावाने यांना कर्ण बधिरांच्या श्रेणीत सन्मानीत करण्यात येणार आहे. मुंबई येथील योगिता थांबे यांना दिव्यांगत्वासह सर्वोत सर्जनशिल जेष्ट व्यक्तींच्या श्रेणीमध्ये सन्मानीत करण्यात येणार आहे. मुळच्या नागपूरच्या आणि सध्या दिल्लीत स्थायीक देवांशी जोशी यांना सर्वोत्तम दिव्यांग कर्मचारी म्हणून सन्मानीत करण्यात येणार आहे.
दिव्यांगांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या राज्यातील चार संस्थांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे. सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त व्यक्तींसाठी कार्यकरणा-या लातूर येथील जनकल्याण समितीला यावेळी सन्मानीत करण्यात येणार आहे. दिव्यांगाच्या मेहनतीने फुललेल्या सातारा जिल्हयातील महाबळेश्वर तालुक्यातील सनराईस कॅन्डल्स या संस्थेला सन्मानीत करण्यात येणार आहे. मुंबई येथील कुर्ला(पश्चिम) भागातील  एजीस लिमीटेड ला  सर्वोत्तम गैर सरकारी संस्थेच्या पुरस्काराने तर मुंबईतीलच विधीमंडळ भागातील स्टेट बँक ऑफ इंडियाचाही सन्मान करण्यात येणार आहे. 
                                                                  ०००००० 

No comments:

Post a Comment