Friday, 2 December 2016

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले स्वीकारणार ‘दिव्यांगजन राष्ट्रीय पुरस्कार’


               
 नवी दिल्ली, दि. २ : महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळास राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार  जाहीर झाला आहे. राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले हे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते स्वीकारणार आहेत. 
            केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालयाच्यावतीने आंतरराष्ट्रीय अपंग दिनाचे औचित्य साधून शनिवारी ३ डिसेंबर ला  विज्ञान भवनात राष्ट्रीय दिव्यांगजन पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत होणा-या या सोहळयात महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाचा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
     राष्ट्रीय अपंग वित्त व विकास महामंडळाच्या योजनांची प्रभावी अमंलबजावणी करण्यासाठी स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाला देशातील सर्वोत्कृष्ट प्राधिकृत वाहिनी म्हणून राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार जाहीर झाला. महामंडळाच्यावतीने राज्यातील बेरोजगार अपंग बांधवांना स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले व त्यांना प्रशिक्षण दिले आहे. कर्जाची प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय श्री.बडोले यांनी घेतला. परिणामस्वरूप महामंडळाच्या कर्ज वसुलीत मोठया प्रमाणात वाढ झाली असून मागील २ वर्षात ३ हजारांहून अधिक दिव्यांग व्यक्तींना कर्ज पुरवठा करण्यात आला. कर्ज शिफारशींमधील अनियमीतता टाळण्यासाठी राज्यभर लाभार्थी मुल्यमापन चाचणी लागू करण्यात आली. श्री. बडोले यांनी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर महामंडळाच्या कार्य प्रणालीत अमुलाग्र बदल झाले. राज्यातील दिव्यांग व्यक्तींकरीता राज्य स्तरीय दिव्यांग साहित्य कला व उद्योजकता संमेलनाचे आयोजन करण्यात आले. दिव्यांग उद्योजकांची यशोगाथा प्रकाशीत करण्यासाठी महामंडळाच्यावतीने यशोगाथा’ नावाचे प्रकाशनही सुरु केले आहे. महामंडळाने दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या विविध योजना आणि दिव्यांगांसाठी केलेल्या महत्वपूर्ण कार्यासाठी हा राष्ट्रीय सन्मान होत आहे.                               

No comments:

Post a Comment