नवी दिल्ली, दि. 02 : ‘रमाई आवास योजने’अंतर्गत २०१९ पर्यंत राज्यात १ लाख ६० हजार घरे बांधण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात दिली.
श्री. बडोले यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारीक चर्चेत त्यांनी ही माहिती दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री. बडोले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी श्री. बडोले यांच्या पत्नी शारदा बडोले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री. बडोले यांचा मुलगा अनिकेत बडोले, उपसंपादक रितेश भुयार, दैनिक सामनाचे दिल्ली प्रतिनिधी निलेश कुलकर्णी, मंथन संस्थेचे आनंद रेखी यावेळी उपस्थित होते.
श्री. बडोले
म्हणाले, समाजाच्या मागास घटकातील जनतेला
पक्के घर बांधून देण्यासाठी राज्य शासन कटीबध्द आहे. त्यादिशेने राज्यात ‘रमाई आवास योजने’अंतर्गत प्रभावी अंमलबजावणी सुरु
आहे. येत्या तीन वर्षात या योजनेअंतर्गत १ लाख ६० हजार घरे बांधण्यात येणार
असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत रमाई आवास योजना आणि शबरी
योजना या राज्य शासनाच्या योजना एकत्रितकरून सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणानुसार वर्ष
२०२२ पर्यंत सर्वांना पक्के घरे बांधून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी
सांगितले.
मागास समाजाच्या विकासाठी कार्यरत महात्मा फुले मागासवर्ग
विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग
वित्त व विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ,संत
रोहीदास चर्मोद्योग आणि चर्मकार महामंडळांच्या सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण निर्णय
घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
जातपडताळणीचा विषय महत्वाचा असून या संदर्भात अधिक पारदर्शकता आणण्यासाठी
ऑनलाईन जातपडताळणी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. राज्यात जातपडताळणी संदर्भात कायदा आणण्यात आला
असून त्यात महत्वपूर्ण तरतुदींची गरज असून यासंदर्भात काम सुरु असल्याचे त्यांनी
सांगितले. श्री.बडोले यांनी यावेळी सामाजिक न्याय मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात
येत असल्या विविध योजना व कार्यक्रमांविषयी माहिती दिली.
यावेळी परिचय केंद्राचे उपसंचालक श्री.कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय
केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात
येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची
माहिती श्री. बडोले यांना दिली. श्री. बडोले यांना यावेळी महाराष्ट्र परिचय
केंद्राची प्रकाशने भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच
कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. बडोले यांनी माहिती जाणून घेतली. श्री.
बडोले यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले.
0000000
No comments:
Post a Comment