नवी
दिल्ली, 05 : मुंबई-वडोदरा
या ४०० कि.मी. लांबीच्या एक्सप्रेस वे चे काम यावर्षी सुरु होणार, मुंबई-पुणे आणि
नागपूर-रायपूर महामार्गांवर रस्ते सुरक्षासंबंधी माहिती देण्यासाठी एफएम रेडीओ
सुरु करणार असल्याची. तसेच, राज्यात महामार्गांवर पुल उभारणार असल्याची माहिती
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तथा जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.
गेल्या अडीच वर्षात भूपृष्ठ
वाहतूक व जहाजबांधनी मंत्रालयाने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची माहिती
देण्यासाठी परिवहन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. गडकरी बोलत होते. यावेळी
विभागाचे राज्यमंत्री पी. राधाकृष्णन आणि सचिव संजय मित्रा उपस्थित होते.
श्री.
गडकरी म्हणाले, देशात उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करण्यात भूपृष्ठ वाहतूक व
जहाजबांधणी मंत्रालयाची महत्वाची भूमिका आहे. आतापर्यंत ४ लाख ६०हजार कोटींची कामे
झाली असून १४ हजार ३९० कि.मी. चे रस्ते बांधण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘एक्सप्रेस वे’ मंत्रालयाचा महत्वाकांक्षी प्रकल्प
असून यावर्षी मुंबई-वडोदरा हा ४०० कि.मी. लांबीच्या ‘एक्सप्रेस
वे’ चे काम सुरु करणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशात १० ‘एक्सप्रेस वे’ उभारण्यात येणार असून यातील
काहींचे काम सुरु असून काहींचे काम याच वर्षी
सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते अपघात कमी करण्यासाठी
मंत्रालयाने महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. एफएम रेडिओच्या माध्यमातून जनजागृतीचे
काम करण्यात येत आहे या अंतर्गत पुणे-मुंबई, नागपूर-रायपूर महामार्गासह अन्य महामार्गांवर
एफएम रेडीओ सुरु करण्यात येणार आहे. सध्या दिल्ली –जयपूर महामार्गावर असे एफएम
रेडीओ केंद्र सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वेच्या मदतीने महाराष्ट्रात महामार्गावर
पुल उभारणार
राष्ट्रीय महामार्ग व
रेल्वे मार्गावर रोड ओव्हर ब्रीज(पुल) उभारण्याचे काम मंत्रालयाने हाती घेतले आहे. या
अंतर्गत महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यांमध्ये जवळपास २५०० रोड ओव्हर ब्रीज
बांधण्यात येणार आहे. याकामी रेल्वे मंत्रालयाकडून ५० टक्के रक्कम मिळणार असून
उर्वरीत ५० टक्के रक्कम भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय संबंधीत राज्यांना देणार असल्याचे
त्यांनी सांगितले. महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाने या प्रस्तावास मंजुरी दिली
असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.
नागपूर येथे एकात्मीक वाहतूक केंद्र उभारण्याबाबत अभ्यास
जनतेला
एकाच ठिकाणी रेल्वे, बस, विमान आणि जलवाहतूक सेवा मिळावी या उद्देशाने मंत्रालयाने
काम सुरु केले आहे. वाराणसी आणि नागपूर शहरांध्ये असे केंद्र उभारण्यासंदर्भात
अभ्यास झाला असल्याचे श्री. गडकरी यांनी सांगितले.
अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घेणार देवस्थानांची
मदत
देशात राष्ट्रीय महामार्गावर होणा-या अपघातग्रस्तांना
मदत करण्यासाठी राज्यातील शिर्डी येथील साईबाबा देवस्थान, शेगाव येथील गजानन
महाराज देवस्थान, मुंबईतील सिध्दीविनायक देवस्थानांसह देशातील अन्य देवस्थानांनी रुग्न
वाहीका चालवाव्या असा मंत्रालयाचा विचार असल्याचे श्री. गडकरी म्हणाले. यासंदर्भात
संबंधीत देवस्थानांना मंत्रालयाच्यावतीने पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे
त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रासह देशातील दुष्काळग्रस्त ११ राज्यांमध्ये
मंत्रालयाच्यावतीने पिण्यासाठी व शेतीच्या उपयोगासाठी पुल कम बंधारे बांधण्याचे कार्य सुरु आहे. गोवा-मुंबई
सागरी मार्ग निर्माण करण्यासंदर्भात मंत्रालयाच्यावतीने काम सुरु असल्याचे
त्यांनी सांगितले. जुन्या पुलांच्या
दुरुस्तीचे व पुनरनिर्माणाचे काम प्राधान्याने करण्यात येत आहे. देशातील महत्वाच्या १२ बंदरांपासून मंत्रालयाला
मोठया प्रमाणात नफा मिळाला असून यावर्षातही
जवळपास ७ हजार कोटींचा नफा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त
केला.देशातील सर्वच बंदरांवर कॅशलेस व्यवहार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रालयाच्या
सेतूभारतम, सागारमाला आदी महत्वाकांक्षी योजनांच्या अमंलबजावणीचे काम सुरु
असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्रालयाच्यावतीने विविध राज्यांत कोशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येत असून
विविध राज्यांच्या ४० प्रस्तावांना या कार्यक्रमाअंतर्गत मंजुरी देण्यात आल्याचे
त्यांनी सांगितले.
00000
No comments:
Post a Comment