नवी दिल्ली, 8 : महाराष्ट्रात मोठया प्रमाणात थेट विदेशी गुंतवणूक
झाली असून राज्यात गुंतवणुकीची मोठी संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी प्रवासी भारतीय दिवस संमेलनात केले.
बेंगलुरू येथे सुरु असलेल्या प्रवासी
भारतीय दिवस संमेलनातील मुख्यमंत्र्याच्या चर्चा सत्रात श्री. फडणवीस बोलत होते.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिध्दरमय्या हे अध्यक्षस्थानी होते, तर परराष्ट्र व्यवहार राज्य मंत्री एम.जे.
अकबर हे सह अध्यक्षस्थानी होते. आसामचे
मुख्यमंत्री सर्बानंद सोनवाल, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, पुडुच्चेरीचे
मुख्यमंत्री व्ही. नारायण सामी यावेळी
उपस्थित होते.
श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात
गुंतवणुकीसाठी उत्तम वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी जगातील गुंतवणूकदारांनी
महाराष्ट्राला प्रथम पसंती दिली. यावर्षी देशात झालेल्या एकूण थेट विदेशी गुंतवणुकी
पैकी ५० टक्के गुंतवणूक ही एकटया
महाराष्ट्रात झाली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात उद्योग पूरक वातावरण
निर्माण झाले असून पायाभूत सुविधाही मोठया प्रमाणात उपलब्ध आहेत. नुकतेच पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मुंबई शहरात १५ अब्ज डॉलर्सच्या कामांची सुरुवात केली. यामध्ये
मुंबई मेट्रो रेल, मोनो रेल, देशातील सर्वात मोठा सागरी मार्ग म्हणून गणना होईल
असा मुंबई सागरी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक आदींचा
समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात ‘नागपूर-मुंबई समृध्दी महामार्ग’ उभारण्यात
येत असून देशातील हा सर्वात मोठा ‘एक्सप्रेस वे’ असणार आहे. या महामार्गाच्या माध्यमातून राज्यातील २२ जिल्हे जोडण्यात
येणार असून यामुळे राज्यात नवे २२ ‘स्मार्ट शहर’ उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘व्हिजीट महाराष्ट्र वर्ष’ मध्ये सहभागी व्हा
‘व्हिजीट महाराष्ट्र वर्ष’ मध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री. फडणवीस यांनी उपस्थितांना केले. ते
म्हणाले, राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने
वर्ष २०१७ हे ‘व्हिजीट महाराष्ट्र वर्ष’ म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्ताने विदर्भातील वनसंपदा आणि वाघ
, कोकणातील समुद्र किनारे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड- किल्ले
आदींसह राज्यातील वैविद्यपूर्ण संस्कृतीची ओळख जगाला होणार आहे.
०००००
No comments:
Post a Comment