Wednesday, 22 February 2017

येत्या ६ महिन्यात लोहगाव विमानतळ विस्तारीकरणाचा विषय मार्गी लावणार - गिरीष बापट














विमानतळासाठी 18 एकर जागेस संरक्षण मंत्रालयाची तत्वत: मंजुरी 
नवी दिल्ली, 22 :  पुणे येथील लोहगांव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी 18 एकर जागेला आज दिल्लीत आयोजित  महत्वाच्या बैठकीत संरक्षण मंत्रालयाने तत्त्वतः मंजुरी  दिली असून येत्या 6 महिन्यात विमानतळ विस्तारीकरणाचा विषय मार्गी लागणार अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांनी दिली.
          केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली  परिवहन भवन येथे आज पुणे येथील लोहगांव विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात आयोजित बैठकीत हा निर्णय झाला. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, भारतीय विमान प्राधिकरणाचे(नियोजन) सदस्य एस रहेजा, पुणे विमानतळ प्रधिकरणाचे संचालक अजय कुमार यावेळी उपस्थित होते.
                 लोहगांव विमानतळ विस्तारीकरणासाठी लष्कराच्या ताब्यातील एकूण जवळपास 34 एकर जागा हस्तातंरित करण्याचे संरक्षण मंत्रालयाने मान्य केले होते. यापैकी 16 एकर जागा संरक्षण मंत्रालयाने देण्यास याआधिच मंजुरी दिली होती, उर्वरीत 18  एकर जागेच्या हस्तांतरणास आजच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली.
            लोहगांव विमानतळ परिसरात जवळपास साडेतीन एकर जागेवर असलेला लष्कराचा इंधन डेपो हटवून अन्य ठिकाणी स्थानांतरीत करण्यास श्री. पर्रीकर यांनी या बैठकीत मान्यता दिली. या बदल्यात राज्य शासन इंधन डेपोसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देईल असे श्री. बापट यांनी बैठकीत सांगितले.
            भारतीय वायुसेनेचे व्हाईस चीफ शिरीष पै लवकरच लोहगाव विमानतळ परिसरातील लष्कर इंधन डेपोच्या स्थानांतरासाठी आवश्यक जागेची पाहणी करण्याकरिता जातील व आपला अहवाल संरक्षण मंत्रालयास सादर करतील असे श्री पर्रीकर यांनी या बैठकीत सांगितले.           
बैठकीनंतर माहिती देताना श्री बापट म्हणाले ,पुणे विमानतळ विस्तारीकरणाबाबत आजच्या बैठकीत अत्यंत महत्वाचा निर्णय झाला. पुणे विमानतळाची जागा सध्या अपुरी पडत असून विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी राज्य शासन प्रयत्नरत आहे. लष्कराच्या ताब्यातील जागेचा वापर करून विमानतळ विस्तारीकरणाचा विषय मार्गी लावण्यात येणार आहे. लष्कराच्या जागेच्या मोबदल्यात राज्य शासन पर्यायी जागा उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  
आजच्या बैठकीत लोहगाव विमातळाच्या विस्तारीकरणा संदर्भातील विविध विषयांबाबत श्री. नितिन गडकरी, श्री. मनोहर पर्रीकर, श्री. प्रकाश जावडेकर आणि श्री. गिरीष बापट यांनी विविध सूचना केल्या .
                                                    ०००००

No comments:

Post a Comment