नवी
दिल्ली, १८ : दिव्यांग महिलांना समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न
करणार, असा विश्वास आंतरराष्ट्रीय पॅरालॉम्पीक खेळाडू सुवर्णा राज यांना आज व्यक्त
केला.
अपंगत्वावर मात करून दिव्यांगांच्या
टेबल टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे नाव उंचविणा-या मुळच्या नागपूर
येथील सुवर्णा राज यांचा आज महाराष्ट्र परिचय केंद्रात सत्कार करण्यात आला, यावेळी
सुवर्णा राज बोलत होत्या. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी सुवर्णा
राज व त्यांचे पती प्रसिध्द पॅरालॉम्पीक टेबल टेनिसपटू व प्रशिक्षक प्रदीप
राज यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी झालेल्या औपचारिक चर्चेच्या
वेळी बोलताना सुवर्णा राज म्हणाल्या, आपल्या देशात अजूनही महिला पूर्णपणे सक्षम
झालेल्या नाहीत त्यात दिव्यांग महिलांची स्थिती अधिकच बिकट आहे.दिव्यांग महिलांसमोर
आदर्शवत ठराव्या अशा मुली रोल मॉडेल म्हणून घडविण्यासाठी आपण प्रयत्न करणार
असल्याचे सुवर्णा राज यांनी यावेळी सांगितले. सुवर्णाला वयाच्या दुस-यावर्षी
पोलियोने ग्रासले आणि त्यांना कायमची व्हीच चेअर धरली. अंपगंत्वावर जिद्द व
मेहनतीच्या जोरावर विजय मिळवत केलेला प्रवास यातुन दिव्यांग महिलांच्या समस्यांची प्रखर
जाणीव झाल्याचे सुवर्णा राज सांगतात.
मुळच्या नागपूर येथील सुवर्णा राज
यांचा दिल्लीतील पॅरालॉम्पीक टेबल टेनीसपटू व प्रशिक्षक प्रदीप राज यांच्याशी २००८
मध्ये विवाह झाला आणि त्या दिल्लीकर झाल्याचे त्यांनी सांगितले. एथलेटीक्समध्ये उत्तम
कामगिरी करणा-या सुवर्णा राज यांनी पती प्रदीप राज यांच्या मार्गदर्शनाखाली टेबल
टेनीस खेळाकडे आपला मोर्चा वळवला. टेबलटेनीस मध्ये देशातील सर्वोत्तम महिला खेडाळूचा मान मिळवत सुवर्णा राज यांनी
कोरीया येथे पार पडलेल्या २०१४ एशीयन पॅरा गेम मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले. सध्या
दिल्लीतील ‘समर्थनम’ या दिव्यांगासाठी
कार्यरत गैरसरकारी संस्थेत त्या कार्यरत आहेत. दिव्यांग टेबल टेनीसपटूंच्या
कल्याणासाठी कार्यरत विविध संस्थामध्ये सुवर्णा राज यांनी काम पाहीले आहे. राष्ट्रपतींच्या
हस्ते २०१४ मध्ये दिव्यांग रोल मॉडेल पुरस्काराने सुवर्णा राज यांना सन्मानीत
करण्यात आले आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या
सुगम्य भारत अभियानाअंतर्गत दिव्यांगांसाठी शासकीय व गैरशासकीय इमारती सुगम
करण्याचे कार्य सुरु आहे. नागपूर येथील इमारतींचे अंकेक्षण(ऑडीट) करण्याची जबाबदारी सुवर्णा राज यांना
सोपविण्यात आली असून त्यांनी १५० इमारतींचे यशस्वीरित्या अंकेक्षण केले आहे.
यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे
प्रास्ताविकात म्हणाले, सुवर्णा राज यांनी अपंगत्वावर मात करून महाराष्ट्रासह भारत
देशाचे नाव उंचावले आहे. कार्यालयाच्यावतीने सुवर्णा यांचा सत्कार करताना सार्थ
अभिमान वाटत असून तरूण पिढीसाठी त्या एक आदर्श असल्याचे श्री. कांबळे म्हणाले. माहिती
अधिकारी अंजू निमसरकर –कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
0000
No comments:
Post a Comment