Monday, 20 March 2017

मुंबईकरांच्या शिस्तप्रिय वागणुकीमुळे शहराला परिवहनासाठी पुरस्कार : परिवहन मंत्री रावते

  
रस्ते सुरक्षेसाठी सर्वाधिक  4 पुरस्काराला महाराष्ट्राला  

नवी दिल्ली,20 : मुंबईकरांच्या शिस्तप्रिय वागणुकीमुळे मुंबई शहराला गौरविण्यात आल्याचे, गौरवोदगार राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काढले.
 हॉटेल हयात रेसीडेंसी येथे मारूती सुझुकी आणि टाईम्स नाऊच्यावतीने आयोजित कार्यक्रमात रस्ते सुरक्षेविषयी उत्तमरित्या कार्य करण्या-या देशातील विविध राज्यांना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी, टाईम्स नाऊच्या नाविका कुमार तसेच मारूती सुझुकीचे वरिष्ठ अधिकारी  उपस्थित होते.

रस्ते सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या उत्तम कार्याबद्दल राज्यातील मुंबई आणि पुणे शहराला आज पुरस्कृत करण्यात आले. पुरस्कार वेगवेगळया 11 श्रेणीत दिले गेले. 11 पैकी सर्वाधीक 4 पुरस्कार महाराष्ट्राला प्राप्त झाले आहेत.  राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
पुरस्काराला उत्तर देताना रावते म्हणाले, मुंबई हे शहर शिस्तबद्ध आहे. तसेच येथील लोकही वाहतुकीच्या नियमांबाबत शिस्तप्रिय आहेत. त्यामुळेच हा पुरस्कार मुंबईला मिळाला आहे. हा पुरस्कार मुंबईकरांचा आहे, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
टाईम्स नाऊ आणि मारूती सुझुकी यांनी केलेल्या पाहणीच्या अहवालामध्ये पादचा-यांच्या हक्क सरंक्षणासाठी मुंबई हे शहर देशात प्रथम ठरले. वाहन व वाहतूक नियंत्रक कायद्याची अंमलबजावनी करण्यातही  मुंबई देशात प्रथम ठरल्याचे नोंदविले आहे. यासह दिव्यांगसाठी उत्तम रस्ते व वाहतूक सुविधा पुरविण्यातही मुंबई देशात अव्वल असल्याचे निरीक्षणात आले आहे.
 प्रदूषण नियंत्रणाच्या श्रेणीमध्ये पुणे शहराने प्रदूषण नियंत्रणात उल्लेखणीय कामगीरी केली असून पुणे शहराला प्रदूषण नियंत्रणसाठी पुरस्कृत करण्यात आले आहे.

अपघात कमी करण्यासाठी मोटार वाहन कायदा करणार : केंद्रीय परिवहन मंत्री गडकरी


रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी मोटार वाहन कायदा लवकरच करणार असल्याचे,  केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधनी मंत्री नतिन गडकरी म्हणाले. या कायदयाच्या प्रभावी अंमलबजावनीमुळे देशातील 90 % टक्के रस्ते सुरक्षेचे प्रश्न सुटतील, असा विश्वास श्री गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. रस्ते सुरक्षेबाबत मुलांना प्रशिक्षित केले पाहिजे.  त्यासाठी अभ्यासक्रमात रस्ते सुरक्षाविषयाचा समावेश असावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. श्री गडकरी यांच्या हस्ते यावेळी इंडिया सेफ्टी इंडेक्स या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. 

No comments:

Post a Comment