64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा
नवी दिल्ली, 7 : 64 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा शुक्रवारी झाली असून सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘कासव’ या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली तर सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा मान ‘दशक्रिया’ या चित्रपटाला मिळाला आहे. याशिवाय ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाला विविध श्रेणीमध्ये अनेक पुरस्कार जाहीर झाले आहेत.
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत वर्ष 2016 च्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली. यावर्षी उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार सुरभी सी.एम. यांना ‘मिन्नामिनुनगु द फायरफ्लाय’ या मल्याळम चित्रपटासाठी जाहीर झाला आहे. तसेच ‘रूस्तम’ या हिंदी चित्रपटासाठी अक्षय कुमार यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख असे आहे. यावर्षी अव्यावसायिक तसेच व्यावसायिक चित्रपटांना अनेक ‘विशेष उल्लेखनिय’ पुरस्कार घोषित झालेले आहेत. यावर्षी नवीन पुरस्कारांची श्रेणीही घोषित करण्यात आली आहे.
देशभरातील चित्रपटांमध्ये सर्वोत्कृष्ट म्हणून ‘कासव’ या चित्रपटाची निवड करण्यात आली. या चित्रपटाची निर्मिती सुमित्रा भावे, सुनिल सुकठनकर आणि मोहन आगाशे यांनी केली आहे. पुरस्कार स्वरूपात प्रत्येकाला स्वर्ण कमळ आणि 2 लाख 50 हजार रोख प्रदान करण्यात येतील.
विविध भाषांमधील सर्वोत्कृष्ट चित्रपटांचीही घोषणा यावेळी करण्यात आली. मराठी भाषेसाठी ‘दशक्रिया’ या चित्रपटाची निवड करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप पाटील यांनी केले असून रंगनील क्रीयेशन यांनी निर्मिती केली आहे. दिग्दर्शक व निर्मात्यास रजत कमळ आणि 1 लाख रूपये रोख असे पुरस्कार प्रदान केले जातील. ‘दशक्रिया’ या चित्रपटासाठीच सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कार प्रसिद्ध चरित्र अभिनेते ‘मनोज जोशी’ यांना जाहीर झाला. रजत कमळ आणि 50 हजार रूपयें रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या चित्रपटाच्या संहिता लेखनासाठी ‘संजय पाटील’ यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट संहितेचा पुरस्कार जाहीर झाला असून रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या दोन मराठी चित्रपटांसह राजेश मापुसकर दिग्दर्शीत ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये बाजी मारली आहे. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार जाहीर झाला असून स्वर्ण कमळ आणि 2 लाख 50 हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या चित्रपटाला सर्वोत्तम संपादनासाठी ‘रामेश्वर’ यांना तर सर्वोत्तम ‘पुन:रिकॉर्डींग व फायनल मिक्सींग’साठी ‘आलोक डे’ यांना पुरस्कार घोषीत झाला. प्रत्येकी 50 हजार रूपये रोख आणि रजत कमळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सर्वोत्कृष्ट वेष-भुषाकाराचा पुरस्कार सचिन लोवलेकर यांना ‘सायकल’ या मराठी चित्रपटासाठी जाहीर झाला आहे. रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
अव्यावसायिक चित्रपटांमध्येही मराठी मोहर बघायला मिळाली ‘आबा ऐकताय ना ?’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार आदित्य जांभळे यांना जाहीर झाला. स्वर्ण कमळ आणि 1 लाख 50 हजार रूपये रोख पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘हम चित्र बनाते है’ हा सर्वोत्कृष्ट ऍनिमेशन चित्रपट ठरला असून मुंबई आयआयटीच्या आयडीसी विभागाने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. पुरस्काराचे स्वरूप रजत कमळ आणि 50 हजार रूपये रोख असे आहे. सर्वोत्कृष्ट शोध चित्रपट ‘प्लासेबो’ ठरला आहे. या चिपटाची निर्मिती अर्चना फडके यांनी तर दिग्दर्शन अभय कुमार यांनी केले आहे. प्रत्येकी रजत कमळ आणि 50 हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे. साहसी /शोध या श्रेणीतील सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार ‘मातीतील कुस्ती’ ला मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रणीत देशमुख यांनी केले असून माधवी रेड्डी यांनी निर्मिती केली आहे. प्रत्येकी रजत कमळ आणि 50 हजार रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
No comments:
Post a Comment