Thursday, 4 May 2017

महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतक-यांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार : ऊर्जा मंत्री बावनकुळे


 

नवी दिल्ली, ०4 :  महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्हयातील शेतक-यांना लवकरच सौर ऊर्जा मिळणार, असल्याची माहिती राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

विविध राज्यांच्या ऊर्जा मंत्र्यांची ऊर्जा, खणन, नवीन तसेच नवीनीकरण विषयांवर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन अशोका हॉटेल येथे करण्यात आले. बैठकीची अध्यक्षता केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी केली. आज दुस-या दिवशीच्या चर्चासत्रानंतर श्री बावनकुळे यांनी ही माहिती दिली.

श्री बावनकुळे म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यातील 800 ते 900 शेतक-यांना एकत्रित  सौर ऊर्जा देण्याच्या पथदर्शी प्रकल्पावर काम सुरू आहे. यासाठी एक मोठा सौर ऊर्जा प्रकल्प यवतमाळ जिल्ह्यात उभारला जात आहे. प्रत्येक शेतक-याला व्यत्किगत पंप न देता एका ऊर्जा प्रकल्पातून सर्वांनाच पुरविण्यात येईल. यामुळे वीजेची बचत होईल. या प्रकल्पाचे उदघाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येईल. यासह शेतक-यांकडे असणारे जुने पंप बदलवून त्यांना नवीन कार्यक्षम ऊर्जा पंप देण्याबाबत शासनस्तरावर धोरण आखले जात आहे.  

रेल्वे विभाग आणि ऊर्जा विभागामध्ये समन्वय ठेवण्यात येईल

वीज निर्मितीतील सर्वात महत्वाचा घटक हा कोळसा आहे. रेल्वेच्या माध्यमातून कोळसा आणला जातो. रेल्वे विभाग आणि राज्यातील ऊर्जा विभागामध्ये अधीक चांगला समन्वय असावा, यासाठी बैठक घेण्यात येईल, असेही श्री बावनकुळे यांनी सांगितले.

बंद पडलेले प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत

दाभोळ वीज प्रकल्पाच्या धर्तीवर राज्यातील बंद पडलेले प्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी बॅकेंशी, शासनस्तरावर, स्थानिक जनतेशी तसेच आवश्यकता पडल्यास केंद्र शासनाची  मदत घेऊन मार्ग काढण्यात येईल. यामधुन जवळपास 2 हजार मेगा वॅट वीज निर्मिती होईल.

ऊर्जा क्षेत्रात राज्य प्रगती पथावर

महाराष्ट्रने वीज निर्मिती करण्याच्या प्रक्रियेत सर्वात प्रथम सांडपाण्याचा वापर केलेला आहे. यासह कोळश्यापासून वीज निर्मिती करतांना निघणा-या राखेची विल्हेवाट लावण्याच्याबाबतही महाराष्ट्राचा पुढाकार असल्याचे परिषदेत सांगितले.
यासह केंद्र शासनाच्या कोळसा धोरणामुळे राज्यातील वीजेच्या दरात 30 पैस्यांने घट झालेली आहे. ऊर्जा वित्त मंडळाने व्याज्याच्या दरात काही टक्क्यांची घट केल्यामुळे राज्याला 500 कोटींचा फायदा झालेला आहे. भारतातील वीज वितरण कंपनीच्या यादीत महाराष्ट्राच्या वितरण कंपनीचा क्रमांक 15 वर होता मात्र, केंद्र शासनाच्या धोरणांच्या अमंलबजावणीमुळे 15 वरून 3 -या क्रमांकवर राज्याने स्थान प्राप्त केले, असल्याची माहिती श्री बावनकुळे यांनी दिली.


No comments:

Post a Comment