Saturday, 8 July 2017

शेती आणि शेतक-यांसाठी बळकट कृषी धोरण आवश्यक : किशोर तिवारी





नवी दिल्ली, 8 : शेती आणि शेतक-यांचा शाश्वत विकास व्हावा यासाठी बळकट कृषी धोरण आवश्यक असल्याची महत्वपुर्ण सूचना वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी आज केली.
 नीती आयोगामध्ये आज विविध राज्यातील शेतकरी आयोगाच्या अध्यक्षांची बैठक बोलविण्यात आली होती. नीती आयोगाच्या कृषी विभागाचे सदस्य प्रो. रमेश चंद यांच्या अध्यक्षतेत ही बैठक झाली. यावेळी विविध राज्यांचे शेतकरी आयोगाचे अध्यक्ष उपस्थित होते. श्री तिवारी यांनी आपले विचार व्यक्त केले.
श्री तिवारी म्हणाले, शेती आणि शेतक-यांसाठी मजबूत अशा कृषी धोरणाची आवश्यकता आहे. या धोरणात शेतक-यांचा संपूर्ण विकास अपेक्षित आहे. याबाबत श्री तिवारी यांनी यावेळी काही सूचना मांडल्या, यामध्ये  शेतक-यांना योग्य प्रमाणात  तसेच योग्य वेळी पत पुरवठा होणे गरजेचे आहे. हा पतपुरवठा गरीबातील गरीब शेतक-यांना मिळणे गरजेचे असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. यासह शेतक-यांना मिळणारे कर्ज हे 4 टक्के दराने असावे,  नैसर्गिक आपत्तीच्याकाळात शेतक-यांवरील कर्ज फेडीची मर्यादा वाढवून मिळावी, कृषी जोखीम निधीची स्थापन व्हावी ज्यातून आपतकालीन परिस्थितीमध्ये शेतक-यांना निधी उपलब्ध करून दयावा. शेतकरी  महिलांना किसान क्रेडीट कार्ड वितरीत करावे, शेतक-यांसाठी तसेच शेतीत उपयोगी असणा-या पशुंसाठी  एकित्रत  एकात्मिक क्रेडिट-पीक पशुधन आरोग्य विमा योजना असावी,  सर्व पीकांसाठी वीमा आवश्यक असून तो कमी दराचा असावा यासह ग्रामीण वीमा विकास निधी  असावा, ज्यामाध्यमातून गावातील विकास कामांचा देखील विमा उतरविला जाऊ शकतो.

     केंद्रशासनाने शेतक-यांसाठी सुरू केलेल्या सर्वच योजनांचा लाभ राज्यातील शेतक-यांना देण्यात आल्याचे श्री तिवारी यांनी सांगितले. यामध्ये सॉईल हेल्थ कार्ड, कृषी पत प्रणालीमध्ये सुधार, प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आदिचा लाभ राज्यातील शेतक-यांनी मोठया प्रमाणात  उचलला असल्याची माहिती श्री तिवारी यांनी यावेळी दिली.

       राज्याने नुकतेच शेतक-यांचे कर्जमाफ केलेले आहे. केंद्र शासनाने 40 हजार कोटींची आर्थिक मदत करावी अशी मागणी, किशोर तिवारी यांनी यावेळी केली.


शेतक-यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी  त्यांना आर्थिक सेवा उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधांचा विकास करणे, मानवी विकास शेती आणि व्यवसाय विकास सेवांमध्ये गुंतवणूक यासह उत्पादनात वाढ करावी, नवनवीन बाजार उपलब्ध करून देणे,  संस्थात्मक सेवांचा विकास करणे, यामध्ये लहान शेतक-यांचे बचत गट बनविणे आणि शेतीसाठी लगाणारे पाणी सामुहिक रीतीने घेण्यासाठी पाणी वापरकर्ते संघटना बनविणे व त्याला बळकट करणे. यासर्व उपाय योजनांमुळे शेतक-यांमध्ये  सामुहिक  भावना जोपासेल तसेच शेतक-यांचा शाश्वत विकास होण्यास मदत होण्याच्या भावना यावेळी श्री तिवारी यांनी व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment