Tuesday, 19 September 2017

पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल राज्यात 5 लाख 97 हजार कोटींचे प्रकल्प




 






नवी दिल्ली, 19 :  पायाभूत सुविधा निर्माण करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे. राज्यात  1 हजार 97 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 5 लाख 97 हजार 319 कोटी इतकी आहे. देशातील सर्व राज्यांची 30 एप्रिल 2017 पर्यंतची पायाभूत सुविधा प्रकल्पांची स्थिती दर्शविणारी पुस्तिका निती आयोगाने तयार केली असून त्यात ही माहिती देण्यात आली आहे.
            निती आयोगाने जाहिर केलेल्या या अहवालात पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये शासकीय पायाभूत सुविधा प्रकल्प, सार्वजनिक क्षेत्रातील प्रकल्प, सार्वजनिक खाजगी भागीदारी प्रकल्प (पी.पी.पी.) व शासकीय प्रकल्पांचा यात समावेश आहे. 5 ते 50 कोटीहून अधिक किमतीच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा समावेश निती आयोगाने आपल्या अहवालात केला आहे.
            देशात एकूण 8 हजार 367 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 50 लाख 58 हजार 722 कोटी इतकी आहे. देशातील या एकूण पायाभूत प्रकल्पांच्या किंमती मध्ये महाराष्ट्राचा सहभाग हा सर्वात जास्त म्हणजे 11.8 टक्के इतका आहे.
            महाराष्ट्रापाठोपाठ दुस-या क्रमांकावर उत्तर प्रदेश हे राज्य असून, या राज्यात 454 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 3 लाख 54 हजार 419 कोटी इतकी आहे, देशातील एकूण प्रकल्प किमतीच्या 7 टक्के वाटा उत्तर प्रदेशाचा आहे. अरूणाचल प्रदेशाचा क्रमांक पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये तिसरा असून या राज्यात 188 पायाभूत सुविधा प्रकल्प असून या प्रकल्पांची किंमत 3 लाख 17 हजार 310 कोटी इतकी आहे, तर या राज्याचा वाटा देशाच्या एकूण पायाभूत प्रकल्पांच्या किंमतीत 6.3 टक्के इतका आहे.
            तमिळनाडू चौथ्या क्रमांकावर तर गुजरात पाचव्या क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये तमिळनाडूचा वाटा हा 6.2 टक्के तर गुजरातचा वाटा 5.7 टक्के इतका आहे. या राज्यांच्या खालोखाल कर्नाटक, मध्यप्रदेश, तेलंगाणा, बिहार, राजस्थान आदी राज्यांचा क्रमांक लागतो.

No comments:

Post a Comment