Wednesday, 11 October 2017

‘टेम्पल कनेक्ट’ अँप च्या माध्यमातून जगभरातील 8,500 हून अधिक मंदिरांचे दर्शन


                         

                           
नवी दिल्ली, 11 :   टेम्पल कनेक्ट या अँप च्या माध्यमातून जगभरातील 8,500 हून अधिक मंदिरांचे दर्शन एका क्लिकवर घेता येते, अशी माहिती  हा अँप विकसित करणारे  गिरीश कुलकर्णी यांनी दिली.
टेम्पल कनेक्ट चे संस्थापक गिरीश कुलकर्णी यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली, यावेळी त्यांनी ही माहिती दिली.  परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पत्रकार,  कार्यालयातील अन्य सदस्य उपस्थित होते.
एका क्लिकवर देशासह जगभरातील मंदिरांच्या न्यासांची, तिथे केल्या जाणा-या विधींची माहिती मिळावी, यासाठी सातत्याने 13 वर्ष प्रयन्तरत राहून त्याचे रूपातंर टेम्पल कनेक्ट या ॲपमध्ये केले, असल्याचे  श्री कुलकर्णी यांनी सांगितले. या ॲपवर हिंदू, बौध्द, जैन, शिख या धर्मींयांच्या महाराष्ट्र, भारतासह जगभरात असलेल्या मंदिरांची इत्यंभूत माहिती आहे. यासह त्या मंदिराशी निगडित सण, उत्सव यांचीही सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सध्यातरी जगभरात अश्या प्रकारचा हा एकमेव ॲप असल्याचे श्री कुलकर्णी म्हणाले.
भक्ताला जर पुजा, अर्चा, अभिषेक आदी विधी पार पाडायचे असल्यास, अथवा अभिषेकाची दक्षिणा दयायची असल्यास ॲप व्दारे ती देता येऊ शकते. गिरीश कुलकर्णी यांनी यासाठी स्वत: मंदिरांच्या व्यवस्थापनाशी स्वत: संवाद साधला आहे. सध्या जगभरातील 5 हजाराहून अधिक मंदिरांचे व्यवस्थापन पेमेंट गेटवे व्दारे जोडले आहे. गिरीश कुलकर्णी यांनी  विकसित केलेले हे अँप हा निश्चितच नव्या तंत्रज्ञानातील मैलाचा दगड ठरलेला आहे.
महाराष्ट्रातील मंदिरे
या ॲप च्या माध्यमातून महाराष्ट्रातील तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, मुंबईचे सिंद्धीविनायक मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल-रूक्मिणी मंदिर जोडलेली आहे. आणखी इतर मंदिरांना जोडण्याचे कार्य सुरू आहे.

परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी  श्री. कुलकर्णी यांना दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने श्री. कुलकर्णी यांना भेट स्वरूपात देण्यात आली.


No comments:

Post a Comment