Tuesday, 24 October 2017

‘दिवाळी अंक’ महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक : कार्य. संपादक आकू श्रीवास्तव






नवी दिल्ली  दि.24 : दिवाळी अंक महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक पंरपरेचे प्रतिक आहे, असे प्रतिपादन पंजाब केसरी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आकू श्रीवास्तव यांनी केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन श्री. श्रीवास्तव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपसंचालक दयानंद कांबळे, माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे, पत्रकार निवेदिता वैंशपायन-मदाने, पुस्तक वितरक श्री मेंढके, ग्रंथपाल रामेश्वर बरडे  ग्रंथालयाचे सदस्य, कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

महाराष्ट्राची सांस्कृतिक पंरपरा समृद्ध असून परिचय केंद्रामार्फत दिल्लीतील मराठी माणसांसाठी दिवाळी अंक वाचण्यासाठी उपलब्ध करून देणे या पंरपरेला साजेसे असल्याचे श्री. श्रीवास्तव म्हणाले. दिवाळीमध्ये दिवाळीतील फराळ आणि त्यासोबत वाचन ही वाचकांसाठी नक्कीच पर्वणी ठरणार.  महाराष्ट्राच्या समृद्ध पंरपरेचे वर्णन करताना त्यांनी त्यांचे स्वानुभवही कथन केले.

महाराष्ट्राला मोठी  वैचारिक चळवळ लाभली आहे. दिवाळी अंकाच्या निमित्ताने अनेक प्रसिद्ध लेखक तसेच नवोदित लेखक विविध विषयांवर लिहीते होतात. यामुळे उत्तमोत्तम वाचन करण्याची संधीही वाचकांना मिळते. हे वाचन अनेकार्थी प्रेरणादायी ठरत असल्याचेही श्री. श्रीवास्तव म्हणाले. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्रातर्फे चालविण्यात आलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात दयानंद कांबळे यांनी दिवाळी अंकाचे महत्व आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या दिवाळी अंक प्रदर्शनाची परंपरा याबाबत माहिती दिली. मराठी साहित्याच्या योगदानावरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.


आजपासून परिचय केंद्रात दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध
आजपासून दिवाळी अंक वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. यामध्ये साधना, उत्सव नात्याचा - झी मराठी , गृहलक्ष्मी, आवाज  (पाटकर), पुढारी, लोकमत दिपोत्सव, कालनिर्णय, सा.सकाळ, हास्यधमाल, लोकप्रभा, क्रिस्त्रीम, मार्मिक, मेनका, मिळून सा-याजणी, चारचौघी, माहेर, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, किशोर, उत्तम कथा, अंर्तनाद, पुरूषउवाच, चपराक, पूणे प्रतिष्ठान, श्री व सौ, पद्मगंधा, रुचिरा, सासर माहेर, गृहसंकेत, अलख निरंजन आदी एकूण 138 दिवाळी अंक मांडण्यात आले आहेत.   


No comments:

Post a Comment