नवी दिल्ली, ६ : पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या व जनसंवादशास्त्र विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी बुधवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची माहिती जाणून घेतली.
दिल्ली अभ्यास दौ-यावर असणा-या या ४२ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी पत्रकारिता विभागाचे सहायक प्राध्यापक सत्यजित मंडे आणि धम्मरत्न जावळे यांच्यासह आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा यावेळी उपस्थित होत्या. प्रसिध्द स्काय डायवर पद्मश्री शितल महाजनही यावेळी उपस्थित होत्या.
यावेळी औपचारिक वार्तालापही झाला. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कार्याची वैविध्यपूर्ण माहिती उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दिली. महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे साधण्यात येणारा समन्वय व महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वय, दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आणि परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध उपक्रम, शासनाचा जनसंपर्क साभांळताना घ्यावी लागणारी खबरदारी आदींची उदाहरणांसहीत माहितीही श्री.कांबळे यांनी दिली.
महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे तीन भाषेतील अधिकृत ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युटयुब चॅनेल, ब्लॉग, व्हॉटसॲप गृप आदींच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात येणारी शासनाची प्रसिध्दी याविषयीही श्री. कांबळे यांनी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.
पद्मश्री शितल महाजन यांच्याशी दिलखुलास गप्पांची मेजवानी
पद्मश्री शितल महाजन यांच्या सोबत यावेळी विद्यार्थ्यांनी संवाद साधला. शितल महाजन यांचा स्काय डायवींगचा प्रवास त्यातील विविध चित्तथरारक अनुभव, या क्षेत्रात करियर व संधी आदी वेग-वेगळया टप्यांची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसंपादक रितेश भुयार यांनी केले तर टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या व जनसंवादशास्त्र विभागाचे सहायक प्राध्यापक धम्मरत्न जावळे यांनी आभार मानले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
http://twitter.com/micnewdelhi
000000
No comments:
Post a Comment