Monday, 11 December 2017

कामाप्रती प्रामाणिक राहिल्यास कामाचा आनंद मिळतो : श्री. सत्यानंद गायतोंडे





नवी दिल्ली, ११ : कोणत्याही व्यवसाय किंवा विभागात असलात तरी तुम्ही आपल्या कामाप्रती प्रामाणिक राहिल्यास कामाचा खरा आनंद मिळतो असे मौलिक विचार कॅनडातील पोलीस अधिकारी सत्यानंद गायतोंडे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्रात मांडले.
        मुळचे महाराष्ट्रातील मुंबईचे रहीवाशी असलेले श्री. गायतोंडे यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी श्री. गायतोंडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
            श्री गायतोंडे म्हणाले, कोणतेही कार्य हे छोटे किंवा मोठे नसते. मुळात आपण जे कार्य करायचे निश्चित केले त्या कामाप्रती प्रामाणिक राहील्यास खरा आनंद घेता येतो. पोलीस, पत्रकारिता, खाजगी क्षेत्र, शासनाचे विभाग आदिंमध्ये कार्य करीत असताना घ्यायची काळजी याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. विविध क्षेत्रात कार्यकरताना वाणीतील मृदुता, जनतेशी सुसंवाद, इतरांना समजून घेण्याची वृत्ती आदी गुण विकसित करण्याची गरज आदींबाबत त्यांनी यावेळी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. कॅनडासह, अमेरिका, इंग्लड, भारत या देशांमधील पोलीस आणि त्यांची कार्य शैली आदींवर त्यांनी यावेळी प्रकाश टाकला.
श्री गायतोंडे सध्या भारतात आले आहेत. त्यांनी महाराष्ट्रातील पोलीस विभागासह अन्य शासकीय व खाजगी क्षेत्रातील कार्यालयांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम राबविला आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात ७२ मार्गदर्शन सत्रांना संबोधित केले आहे. श्री. गायतोंडे यांनी आज दिल्ली येथील महाराष्ट्र सदनातील महाराष्ट्र पोलिसांना मार्गदर्शन केले व त्यानंतर दुपारी महाराष्ट्र परिचय केंद्रातही त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, पत्रकार, कार्यालयाला भेट देणारे पाहुणे उपस्थित होते.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, उपसंपादक रितेश भुयार यांनी सुत्रसंचालन केले तर माहिती अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                               http://twitter.com/micnewdelhi                              
                                         000000                                        
सूचना : सोबत छायाचित्र जोडली  आहेत

No comments:

Post a Comment