वरिष्ठ
पत्रकार जयपाल पाटील यांचे व्याख्यान
नवी
दिल्ली, ६ : महाराष्ट्र
परिचय केंद्रात आज पत्रकार दिन साजरा करण्यात आला.अलिबाग येथील वरिष्ठ पत्रकार
जयपाल पाटील यांचे यावेळी ‘सुरक्षीत जीवन’ या
विषयावर व्याख्यान झाले. यावेळी मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर
यांना अभिवादन करण्यात आले.
पत्रकार दिनानिमित्त महाराष्ट्र परिचय केंद्रात
कार्यक्रम आयोजित करण्यात आला.यावेळी परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे, माहिती
अधिकारी अंजू निमसरकर कांबळे, वरिष्ठ पत्रकार जयपाल पाटील, नंदुरबार जिल्हयातील
शहादा येथील दै. प्रश्न चिन्ह चे संपादक राजेंद्र अग्रवाल यांच्यासह कार्यालयातील
अधिकारी व कर्मचारी यांनी बाळशास्त्री
जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पत्रकारितेत दिर्घकाळ कार्यरत वरिष्ठ
पत्रकार जयपाल पाटील यांनी यावेळी ‘सुरक्षीत जीवन’ या विषयावर मार्गदर्शन केले. झोपण्यापूर्वी घरातील सिलेंडर बंद करणे, घरात
विजेच्या सुरक्षेसाठी ‘एमएसबी’ स्वीच
लावण्याचे महत्व, रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी
घ्यावयाची काळजी आणि रस्ते अपघातात जखमींना करावयाची मदत, महिला
सुरक्षेसाठी महाराष्ट्रासह केंद्र सरकारने सुरु केलेले विशेष ‘पोलीस पथक’ व ‘ॲप’ आदिंविषयी त्यांनी उदाहरणांसहित माहिती दिली.
श्री पाटील हे उत्तम
कवी आहेत. त्यांच्या बडबड गीतांचा रशिया मध्ये सन्मान झाला आहे, मास्को व ताश्कंद
आकाशवाणीहून त्यांच्या बडबडगीतांचे सादरीकरण झाले आहे. श्री. पाटील यांनी यावेळी ‘लाडू’ , ‘लेखनी’ व ‘सखी’ या कवितांचे सादरीकरण
केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसंचालक
दयानंद कांबळे यांनी तर सूत्रसंचालन उपसंपादक रितेश भुयार यांनी केले.
बाळशास्त्री जांभेकर यांनी ६
जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठी
भाषेतील पहीले वृत्तपत्र काढून मराठी वृत्तपत्रांचा भक्कम पाया रचला. पाश्चात्य विद्या व शिक्षण आत्मसात करून ‘दर्पण’च्या माध्यमातून जांभेकर
यांनी समाजात नवी जीवनमुल्ये रूजविण्यात मोलाचे योगदान दिले.
बाळशास्त्री जांभेकर यांच्या या योगदानासाठी त्यांचा जन्मदिन ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.
00000
No comments:
Post a Comment