Saturday 6 January 2018

उच्च शिक्षणात महाराष्ट्र आघाडीवर



विद्यापीठ प्रवेशामध्ये महाराष्ट्र अव्वल : 9 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश

नवी दिल्ली,  ६ : तंत्रशिक्षण, दूरशिक्षण, शिक्षक प्रशिक्षण व विद्यार्थी प्रवेश आदी विविध क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे चित्र देशपातळीवर केल्या गेलेल्या उच्च शिक्षण सर्वेक्षणातून समोर आले आहे. 

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्च शिक्षणाची देशातील सद्यस्थिती दर्शविणारा 2016-17 चा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते या अहवालाचे प्रकाशन झाले. 

देशात विद्यापीठस्तरीय अभ्यासक्रमांसाठी  प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. महाराष्ट्रात 9 लाख 40 हजार 480 विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली आहे, तामिळनाडू 8 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांसह दुसऱ्या तर दिल्ली 7 लाखांहून अधिक विद्यार्थी प्रवेशासह देशात तिसऱ्या स्थानावर आहे. 
दूर शिक्षणात महाराष्ट्र नंबर 1

देशातल्या दूर शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी नोंदणी मध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. देशात 40 लाख 89 हजार 781 विद्यार्थी दूर शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत, यात 17.1 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे, राज्यात सुमारे 7 लाख विद्यार्थी दुरशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत.
       सर्वाधिक महाविद्यालय असणाऱ्या देशातील पहिल्या 10 जिल्ह्यात महाराष्ट्रातील 3 जिल्हे

सर्वाधिक महाविद्यालय असणारे देशात 10 जिल्हे आहेत, यामध्ये महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांचा समावेश आहे. सर्वाधिक महाविद्यालय असलेल्या जिल्ह्यात बेंगलुरू 1025 महाविद्यालयांसह प्रथम क्रमांकावरआहे तर पुणे - 421 महाविद्यालय, नागपूर- 332 तर मुंबईत 322 महाविद्यालय असे एकूण 1075 महाविद्यालय या तीन जिल्ह्यात आहेत. 
महाराष्ट्रात सर्वाधिक शिक्षक प्रशिक्षण संस्था

देशात सर्वाधिक शिक्षक प्रशिक्षण संस्था महाराष्ट्रात आहेत. राज्यात 4 हजार 308 शिक्षक प्रशिक्षण संस्था आहेत, या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थी संख्येतही महाराष्ट्र अव्वल आहे, एकूण 39 हजार 657 विद्यार्थी या संस्थांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत, यात 29 हजार 822 विद्यार्थिनींचा समावेश आहे. शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमासाठी मुलींच्या प्रवेशामध्ये राज्याचा देशात दुसरा क्रमांक आहे तर तामिळनाडू मुलींच्या प्रवेशात अव्वल ठरले आहे. 
सर्वाधिक पॉलीटेक्निक कॉलेज महाराष्ट्रात

देशात 3 हजार 672 पॉलीटेक्निक कॉलेज आहेत,यापैकी 667 कॉलेज राज्यात आहेत, यामध्ये 2 लाख 45 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पॉलीटेक्निक कॉलेज प्रवेशामध्ये तामिळनाडू प्रथम क्रमांकावर आहे. महाराष्ट्र दुसऱ्या तर कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा

                                                                       000000


                                                      

No comments:

Post a Comment