Wednesday, 7 February 2018

शालेय खेळाडुंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे :गृहराज्य मंत्री हंसराज अहीर











                                                      
                                            
नवी दिल्ली, ७ : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांनी खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी केली असून त्यांनी यापुढे देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे अशा शुभेच्छा आज केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी महाराष्ट्रातील शालेय खेळाडुंना दिल्या.  
        श्री. अहीर यांच्या ८, बिशंबरदास मार्ग या निवासस्थानी खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी महाराष्ट्रातील खेळाडुंचा गौरव समारंभ आज आयोजित करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रातील खासदार महोदय यावेळी मंचावर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते खेळाडुंचा प्रातिनिधीक सत्कार करण्यात आला.
            श्री. अहीर म्हणाले, महाराष्ट्रातील शालेय खेळाडुंनी खेलो इंडिया स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशात विविध क्षेत्रात अव्वल असणा-या महाराष्ट्राला शालेय खेळाडुंनी सुवर्ण पदकांची लयलूटकरून खेलो इंडिया स्पर्धेत आजच्या ८ व्या दिवशी  देशपातळीवर अव्वल क्रमांक मिळवून दिला ही अभिमानाची बाब आहे. या खेळाडुंनी पुढे  आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत देशाचे नाव उज्ज्वल करावे अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.  
            यावेळी खासदार रावसाहेब दानवे पाटील आणि विनायक राऊत यांनीही या खेळाडुंना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास खासदार सर्वश्री अनिल शिरोळे, गोपाल शेटटी, सदाशिव लोखंडे, कपील पाटील, संजय धोत्रे, दिलीप गांधी, ए.टी.नाना पाटील, प्रतापराव जाधव, डॉ. विकास महात्मे उपस्थित होते.

            येथे सुरु असलेल्या खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत राज्यातील ३४६ शालेय खेळाडु सहभागी झाले असून त्यांच्या सोबत ४३ प्रशिक्षक व क्रीडा मार्गदर्शक आहेत.
 महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा     :  http://twitter.com/micnewdelhi
                                                                     ००००००




No comments:

Post a Comment