नवी
दिल्ली 15 : महाराष्ट्राला राज्य कामगार विमा योजनेसाठी 1500 कोटी रूपयांचा निधी
मिळावा, अशी मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार व आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत
यांनी आज केंद्र शासनाकडे केली आहे.
येथील श्रम शक्ती भवनमध्ये राज्याचे वित्त मंत्री सुधीर
मुनगंटीवार आणि आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी केंद्रीय कामगार कल्याण राज्यमंत्री
संतोष गंगवार यांची भेट घेऊन राज्य कामगार विमा योजनेसाठी केंद्राकडून 1500 कोटी
रूपयाचा मिळावा,अशी मागणी केली. या मागणीवर लवकरच सकारात्मक विचार केला जाईल, असे
आश्वासन केंद्रीय राज्यमंत्री श्री गंगवार यांनी दिले.
महाराष्ट्रात सुमारे 50 लाखाहून अधिक कामगार आहेत ते आपल्या पगारातील काही निधी कर्मचारी
विमा योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडे जमा करतात. कामगाराच्या आरोग्यासाठी,
उन्नतीसाठी व सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाला 1500 कोटी रूपयांचा निधी
राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत मिळण्याबाबतची मागणी राज्य शासनाच्यावतीने आजच्या
बैठकीत करण्यात आली.
महाराष्ट्राच्या
कामगांराकडुन जमा होणा-या निधीमधून सध्या महाराष्ट्राला 200 कोटी रूपयांचा निधी केंद्राकडून दिला जातो. या
निधीमध्ये 8 पट वाढ करून राज्याला 1500 कोटी रूपयांचा निधी मिळावा, यामुळे राज्यातील
कामगारांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करता येतील.
महाराष्ट्रात
राज्य विमा कर्मचारी सोसायटी निर्माण करावी : संतोष गंगवार
राज्य शासनाला कामगार कल्याणासाठी निधी केंद्र शासन उपलब्ध करून देण्याचे आश्वासन केंद्रीय
कामगार कल्याण राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी आज आश्वासन दिले असून यासाठी महाराष्ट्र
शासनाने सोसायटी निर्माण करावी, असे केंद्रीय राज्यमंत्री यांनी बैठकीत निर्देशीत
केले. यावर श्री मुनगंटीवार आणि डॉ. सावंत या व्दय मंत्र्यानी लवकरच अशी सोसायटी स्थापन करण्याचे सांगितले.
बैठकीत राज्यात कामगारांसाठी पुणे व नागपूर जिल्हयात नवीन
रूग्णालये तसेच आवश्यकतेनुसार राज्यातील इतर ठिकाणीही रूग्णालय उभारली
जाण्याविषयीही आज चर्चा झाली. वाशी येथे उभारलेल्या कामगार रूग्णालयाचे उद्घाटन
लवकरच केंद्रीय कामगार कल्याण मंत्री यांच्या हस्ते होणार असल्याचेही बैठकीत ठरले.
यावेळी कामगार कल्याण आयुक्त डॉ. संजय
कुमार उपस्थित होते.
No comments:
Post a Comment