Tuesday, 13 March 2018

क्षयरोगाची लक्षणे तपासण्यासाठी नव तंत्रज्ञान विकसित व्हावे : आरोग्य मंत्री डॉ. सावंत


               



              
नवी दिल्ली 13 : क्षयरोगाची लक्षणे तपासण्यासाठी नव तंत्रज्ञान विकसित व्हावे, अशी महत्वपूर्ण सूचना राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी आज येथे केली.
        येथील विज्ञान भवनात केंद्रिय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने क्षयरोग निर्मुलनासंदर्भातील शिखर सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले. या शिखर सम्मेलनाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जे.पी. नड्डा, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल, इंडोनेशिया, नायझेरियाचे आरोग्यमंत्री, जागतिक आरोग्य संगटनेचे महासंचालक, वरिष्ठ अधिकारी यावेळी मंचावर उपस्थित होते. राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दिपक सावंत, सार्वजनिक आरोग्य विभागाचे  प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास उपस्थित होते.
        मुख्य कार्यक्रम संपल्यानंतर केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री श्री नड्डा यांच्या अध्यक्षतेत सर्व राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी श्री सावंत यांनी काही महत्वपूर्ण सूचना मांडल्या. यामध्ये क्षयरोगाच्या तपासणीसाठी वापरण्यात येणा-या चाचण्यामध्ये कुपोषित बालकांची, अन्य बालकांची तपासणी करण्यासाठी या बालकांच्या शौचाची, मुत्राची अथवा शरीरातील अन्य द्रव्यापासूनही  तपासणी करण्यासंदर्भातील संशोधन विकसित होणे गरजेचे असल्याची डॉ. सावंत यांनी मांडली.
        क्षयरोग हा अधिसूचित रोगांमध्ये मोडत असून खाजगी रूग्णालयात कार्यरत असणा-या डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणा-या क्षयरोगाच्या रूग्णांची माहिती शासनाला द्यावी, तसे बंधनकारक करावे. यासह औषधीच्या दुकानदारांनीही त्यांच्याकडे औषधीसाठी येणा-या क्षयरोग रूग्णांची माहिती शासनाला दिल्यास राज्यात क्षयरोगाची लागण झालेली किती रूग्ण आहेत याची योग्य माहिती गोळा होईल.
                मोठया महानगर पालिकांचा सहभाग क्षय रोगाच्या निदानासाठी घ्यावा
        मोठया महानगर पालिकांच्या हद्दीत वास्तव्यास असणा-या क्षयरोग रूग्णांसाठी महापलिकांनी विशिष्ट कार्यक्रम राबवावा. यामध्ये नगरविकास विभागाने धोरण ठरवावे, यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी नगरविकास विभागाला सूचित करावे, अशी सूचनाही डॉ. सावंत यांनी आजच्या बैठकीत मांडली.

No comments:

Post a Comment