Tuesday, 17 July 2018

गंधर्वांच्या सुरांची छाप आजही अमिट : पद्मश्री कीर्ती शिलेदार




                          ‘बालगंधर्व’ पुस्तकाच्या  हिंदी अनुवादाचे प्रकाशन

नवी दिल्ली, 17 :  ‘बालगंधर्वांनी जगाचा निरोप घेऊन पन्नास  वर्ष लोटली. मात्र, रसिक मनावर त्यांच्या सुरांची छाप आजही अमिट आहे आणि हीच गंधर्वांची थोरवी आहे.’, अशा शब्दात अखिल  भारतीय  मराठी  नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा,  पद्मश्री  कीर्ती  शिलेदार  यांनी  बालगंधर्वांबद्दलच्या  भावना  व्यक्त  केल्या.
जादुई स्वरांनी, अभिनयाने संगीत रंगभूमी गाजविणा-या नारायण राजहंस तथा बालगंधर्व यांचा जीवनपट उलगडून दाखविणा-या प्रसिध्द नाटय्‍ लेखक अभिराम भडकमकर यांच्या ‘असा हा बालगंधर्व’ या कादंबरीच्या ‘बालगंधर्व’ या  हिंदी  अनुवादित  पुस्तकाचे  सोमवारी  श्रीमती  शिलेदार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी त्या बोलत होत्या.
बालगंधर्वांच्या सुवर्णमहोत्सवी स्मृती वर्षाचे औचित्य साधून दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्या सहकार्याने  साहित्य अकादमीच्या रविंद्र भवन मध्ये या प्रकाशन सोहळयाचे आयोजन करण्यात आले. भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष खासदार विनय सहस्रबुद्धे, पद्मश्री रामगोपाल बजाज, अभिनेते व लेखक  दीपक करंजीकर, राजकमल प्रकाशनाचे संपादक सत्यानंद निरूपम, नाट्य-पटकथालेखक तथा दिग्दर्शक अभिराम भडकमकर  व कादंबरीचे अनुवादक गोरख  थोरात यावेळी मंचावर उपस्थित होते.

            ‘मम आत्मा गमला…’ या नाटयपदाने वातावरण भारावले

   बालगंधर्वांच्या संगीत रंगभूमीवरील योगदानावर प्रकाश टाकताना श्रीमती शिलेदार यांनी, सुरेल गळयातून  सादर  केलेल्या ‘संगीत स्वयंवर’ नाटकातील ‘मम आत्मा गमला’ या नाटयपदाने वातावरण भारावून गेले. उपस्थितांनी टाळया वाजवून यास उत्सफूर्त दाद दिली. तत्पूर्वी श्रीमती शिलेदार म्हणाल्या, संगीत रंगभूमी हा बालगंधर्वांचा ध्यास होता. वेशभूषा, नेपथ्य, संगीत अशा सर्वच विधांमध्ये त्यांनी महत्वाचे बदल घडवून आणले. संगीत  रंगभूमीवर ऑर्गन हे वाद्य  आणण्याचे श्रेय बालगंधर्वांकडे जाते, असे त्यांनी सांगितले. माझे  आई-वडील जयराम  व जयमाला शिलेदार यांना गंधर्वांसोबत काम करण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.  

पुस्तकाचे अनुवादक गोरख  थोरात यावेळी म्हणाले, बालगंधर्व वाचल्यानंतर हाती हिरा गवसल्याची माझी भावना झाली. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त प्रसिध्द साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू : जगण्याची समृध्द अडगळ’ या पुस्तकाचा अनुवाद केल्यानंतर ‘असा हा बालगंधर्व’ कादंबरीचा अनुवाद तुलनेने  सोपा होता. मात्र, या अनुवाद कार्यात बरेचदा तांत्रिक शब्दांच्या अडचणी आल्या त्याही श्री.भडकमकरांसोबतच्या चर्चेतून दूर झाल्या. बालगंधर्वांच्या आयुष्यातील कित्येक प्रसंग वाचताना डोळे भरून आले. हे पुस्तक माझ्या आयुष्याचे मोठे संचित असेल असेही श्री. थोरात यांनी सांगितले.

            श्री. भडकमकर म्हणाले, बालगंधर्वांचे आयुष्य एखाद्या काव्या सारखे आहे. पराकोटीचे ऐश्वर्य, संपन्नता आणि कमालीचे दारिद्रय त्यांनी अनुभवले. त्यांच्या आयुष्यातील ही गुंतागुंत ‘असा हा बालगंधर्व’ या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न  केला. गौहर जान आणि बालगंधर्वांच्या नात्यातील वेगवेगळया पैलूंवरही या कादंबरीत प्रकाश टाकला. आधुनिक परिप्रेक्ष्यातून बालगंधर्व मांडण्याचा प्रयत्न या कांदबरीतून मी केला. आज हिंदी भाषेत ही कादंबरी प्रकाशित होत असल्याचा अतीव आनंद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
    अभिनेते व लेखक दीपक करंजीकर यांनी यावेळी  विचार मांडले.  
000000

               रितेश भुयार /वृत्त वि. क्र.264/ दिनांक 17.07.2018

No comments:

Post a Comment