Wednesday, 1 August 2018

इंदूर-मनमाड रेल्वे मार्गाच्या पहिल्या टप्प्यासाठी निविदा मंजूर -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी









येत्या चार वर्षात रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होणार

नवी दिल्ली, 1 : इंदूर-मनमाड नवीन रेल्वे मार्गाचे सर्व अडथळे दूर झाले असून पहिल्या टप्‌यासाठी आज निविदा मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे दिली. येत्या चार वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
            केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयाच्या अंतर्गत येणा-या पोर्ट रेल कनेक्टीव्हिटी कॉपोरेशन लि.च्या वतीने व मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने 362 किलोमीटर लांबीचा नवीन रेल्वे मार्ग उभारल्या जाणार आहे. या रेल्वे मार्गातील सर्व अडथळे दूर करण्यात  आले आहेत. पहिल्या टप्‌या अंतर्गत विर ते नरडाणा सेक्शन मध्ये पांझरा नदीवरील मोठा पुल व त्यापूढील तीन पुलांसाठी रु.50 कोटींच्या  निविदा आज मंजूर करण्यात आल्याची माहिती श्री. गडकरी यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या रेल्वे मार्गासाठी जवळपास सहा वर्षाचा कालावधी लागणार आहे. मात्र हे काम चार वर्षात पूर्ण करण्याच्या सूचना केल्या असल्याची माहितीही श्री. गडकरी यांनी दिली. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री तथा धुळेचे खासदार डॉ. सुभाष भामरे उपस्थित होते.  
महाराष्ट्रातून 186 किलोमीटर रेल्वे मार्ग
वर्ष 2016 मध्ये  मंजूर झालेल्या 362 किमी अंतराच्या इंदूर –मनमाड रेल्वे मार्गापैकी महाराष्ट्रातून 186 किमी रेल्वे मार्ग जाणार आहे. हा ब्राडगेज रेल्वे मार्ग असून यावर मोठे 13 पूल तर 249 लहान पुलासह असे एकूण 595 रेल्वे पूल असणार आहे. या रेल्वे मार्गासाठी एकूण 2008 हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात येणार असून महाराष्ट्रातील 964 हेक्टर तर मध्यप्रदेशातील 1044 हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्यात येणार आहे. या रेल्वे मार्गासाठी एकूण 8 हजार 574 कोटी  79 लाख रुपये खर्च अपेक्षित  असून यातील प्रत्येकी 15 टक्के निधी हा महाराष्ट्र व मध्यप्रदेश सरकार इक्वीटीच्या माध्यमातून भांडवल उभारणार आहे तर उर्वरित 70 टक्के निधी हा जेएनपीटी स्वत: व कर्ज घेऊन उभारणार आहे.  
या नवीन रेल्वे मार्गामुळे मनमाड व इंदूर या औद्योगिक केंद्राचा विकास होऊन या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रेाजगार निर्मिती होणार आहे. तसेच उभय राज्यांतील रेल्वे मार्ग लगतच्या  शेती व औद्योगिक क्षेत्राचा विकास होईल असा विश्वास श्री. गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला.  या रेल्वे मार्गामुळे दिल्ली-चेनई  व‍ दिल्ली बेंग्लुरु  हे रेल्वे मार्गाचे अंतर 325 किलोमीटरने कमी होणार असून यामुळे रेल्वे प्रवाशाचा फेरा वाचणार आहे. तसेच मुंबई-इंदूरचे अंतर दोनशे किलोमीटर ने कमी होईल. इंदूरहुन दर वर्षी 47 हजार कंटेनर मुंबईस्थित जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टला जातात. इंदूर –मनमाड रेल्वेमार्ग सुरु झाल्यावर  मुंबई इंदूरचे अंतर 200 किमी ने कमी होईल व   वाहतूक कोंडीही कमी  होईल.
संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केला सातत्याने प्रत्यक्ष पाठपुरावा
धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार तथा  संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी इंदूर-मनमाड  रेल्वे मार्गासाठी सातत्याने प्रत्यक्ष पाठपूरावा केला असून त्यांच्या प्रयत्नांना यश आल्याचे श्री. गडकरी म्हणाले.  या रेल्वे मार्गामुळे धुळे जिल्ह्यातील शेती व औद्योगिक क्षेत्राला गती येईल्‍ व मोठा रोजगार उपलब्ध होईल, असेही गडकरी म्हणाले.
डॉ. भामरे यांनी मानले मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार
इंदूर-मनमाड रेल्वे मार्गातील सर्व अडथळे दूर होऊन आज पहिल्या टप्प्यातील कामासाठी निघालेल्या निविदामुळे या कामाला गती येणार आहे.  यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी , केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल व केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांचे डॉ. भामरे यांनी आभार मानले.
                                            ०००००
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 286  दिनांक १.०८.२०१८ 
 सूचना : सोबत फोटो जोडले आहेत.

                                  

No comments:

Post a Comment