मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती
नवी दिल्ली, 17 : माजी
प्रधानमंत्री भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर आज स्मृतीस्थळ येथे
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती,
प्रधानमंत्री तसेच विदेशी पाहुणे यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित
होते.
श्री.वाजपेयी
यांचे गुरूवारी सायंकाळी येथील एम्स रूग्णालयात दीर्घ आजाराने निधन झाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी एम्स रूग्णालयात जाऊन त्यांचे दर्शन घेतले, तसेच
6-ए कृष्ण मेनन मार्गस्थित वाजपेयी यांच्या निवासस्थानी रात्री अंत्यदर्शन
घेऊन श्रद्धांजली वाहिली. शुक्रवारी 10 वाजतापासून दीनदयाळ उपाध्याय
मार्गावरील भाजपा मुख्यालयात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात
आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी अंत्यदर्शन घेतले. राज्यातील मंत्री,
सर्वश्री गिरीश महाजन, पंकजा मुंडे, महादेव जानकर, संभाजी निलंगेकर-पाटील
यांच्यासह राज्यातील खासदार व आमदारांनीही अंत्यदर्शन घेतले.
दुपारी
2.30 वाजता भाजपा मुख्यालयापासून अंत्ययात्रा निघाली. प्रधानमंत्री
नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री फडणवीस
यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांनी स्मृतीस्थळापर्यंत पायी चालत
अंत्ययात्रेत सहभाग घेतला. वाजपेयींना अखेरचा निरोप देण्यासाठी दीनदयाळ
उपाध्याय मार्गाच्या दुतर्फा मोठ्या संख्येने जनसमूह जमला होता. ‘अटल
बिहारी अमर रहे’ अशा घोषणा आणि पुष्पांचा वर्षावांनी वातावरण शोकमग्न व
भाऊक झाले होते. बहादुर शहा मार्ग, दिल्ली गेट, दर्यागंज मार्गाने
अंत्ययात्रा थेट स्मृतीस्थळ येथे पोहचली.
अंत्यविधीसाठी
विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. देशाच्यावतीने कॅबिनेट सचिवांनी
वाजपेयी यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले. तीनही सेनादलाच्या
प्रमुखांनी, संरक्षण मंत्री व संरक्षण राज्यमंत्री, लोकसभा अध्यक्षा,
उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांनी ही पुष्पचक्र वाहिले. भूतान
नरेश, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रापती, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ आदी
देशांच्या सर्वोच्च प्रतिनिधींनी पुष्पचक्र वाहिले. वाजपेयी यांच्या नात
निहारीका यांच्याकडे मानाचा राष्ट्रध्वज सोपविण्यात आला. त्यांच्या मानस
कन्या नमिता भट्टाचार्य यांनी मुखाग्नी दिला. संपूर्ण देशाने हा भावूक
प्रसंग दूरचित्रवाहिन्यांच्या माध्यमातून आपल्या मनात साठवून लाडक्या
प्रधानमंत्र्यास अखेरचा निरोप दिला.
वाजपेयी
यांचे अंत्यदर्शन घेता यावे म्हणून केंद्र शासन व केंद्रशासनाशी संलग्न
कार्यालये दुपारनंतर बंद ठेवण्यात आली होती. तसेच सात दिवसांसाठी देशभरात
राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.
0000000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.312/दि.17-08-
No comments:
Post a Comment