Thursday, 23 August 2018

भारतातील बुद्धीस्ट सर्कीट जगासाठी खूले : राष्ट्रपती कोविंद




6 व्या आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट परिषदेचे राष्ट्रपती यांच्याहस्ते उदघाटन

नवी दिल्ली, 23 : भारतीय संस्कृतीत तथागत बुध्दांनी सांगितलेले धम्म देसनेची पाळेमुळे रूजलेली आहेत. बुध्दांच्या अस्तित्वाचे दर्शन करण्यासाठी भारतातील बुद्धीस्ट सर्कीट जगासाठी खूले असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 6 व्या आंतरराष्ट्रीय बुद्धीस्ट परिषदेच्या उदघाटन प्रसंगी केले.  
येथील विज्ञान भवनात केंद्रिय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने 6 व्या आंतराराष्ट्रीय बुद्धीस्ट परिषदेचा उदघाटन सोहळा आज आयोजित करण्यात आला, त्यावेळी राष्ट्रपती बोलत होते.  उदघाटन समारोह कार्यक्रमाची अध्यक्षता केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) के.जे. अल्फोंस यांनी केली. यावेळी पर्यटन विभागाच्या सचिव रश्मी वर्मा, जपानचे भारतातील राजदूत केन्जी हिरामत्सू , पर्यटन विभागाचे महासंचालक सत्यजित राजन मंचावर उपस्थित होते.  या परिषदेच्या उदघाटन सोहळयास राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल उपस्थित होते.
भारतातून बौध्द धर्म आशिया खंडात आणि जगभर पसरला. बौध्द धर्माने अध्यात्मासह जगाला बरच काही दिले असल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाले, बौध्द धर्म  ज्ञानाचे वाहक आहे. बौध्द धर्माने कला आणि शिल्पाला जोपासले असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.  ध्यान साधनेच्या अनेक पारंब्या बौध्द धर्मात आहेत. पुरातन काळात बौध्द उपासक-उपासीकांमुळेच देश-विदेशात भंतेनी बौध्द धर्माचा प्रचार-प्रसारात मोठी भुमिका बजावली आहे. बौध्द धर्मामुळे इसवी सन पूर्वीच भारताचे नाते जगाशी जोडले गेले असल्याचेही राष्ट्रपती म्हणाले. तथागत बुद्धांचे तत्वज्ञान हे आजही मागदर्शक असल्याचे राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले.
भारतात तथागत बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली, त्यांच्या आयुष्यातील मोठा काळ हा उत्तर भारतात गेला. त्यांच्या शिष्यांनी भारतभर बुद्ध धर्माचा प्रचार-प्रसार केला आणि  त्यामुळेच भारताच्या प्रत्येक कोप-यात बौध्द धर्माचे स्तुप, चैत्य, विहार, आदिंचे पुरातत्व अवशेष आढळतात. हे पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक भारतात येतात.
बौध्द धर्माच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडविण्यात केंद्रीय आणि राज्यातील पर्यटन मंत्रालय, खाजगी पर्यटन सेवा उपलब्ध करून देण्या-या संस्था, स्थानिक लोक मोठी जबाबदारी निभावतात. व्यवसायिक दृष्टीकोनातून पर्यटन क्षेत्र वाढत आहे.  या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे जगभरातील पर्यटक भारताकडे वळतील याचा फायदा स्थानिक रोजगार वाढीसाठीही होईल, असा विश्वास  राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
यावेळी केंद्रिय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने landofbuddha.in या संकेत स्थळाची सुरूवात राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच यावेळी भारतातील बौध्द स्थळांवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली.
6 व्या आंतरराष्ट्रीय बुध्दीस्ट परिषदेचे जपान हे भागीदार आहे. परिषदेस भारतीय उपमहाखंडातील देशांचे पर्यटन मंत्री उपस्थित होते. यासह भंते, बौध्द धम्माचे अभ्यासक, खाजगी पर्यटन सेवा पुरविणा-या पर्यटन संस्था असे 30 देशातील  200 प्रतिनिधी  या कार्यक्रमास उपस्थित होते. तीन दिवस चालणारी ही आंतरराष्ट्रीय परिषद महाराष्ट्र, बिहार आणि उत्तर प्रदेश मध्ये होणार आहे. सर्व 200 प्रतिनिधींना अजंठा, राजगीर, नालंदा, बोधगया येथे घेऊन जाण्यात येईल. ही परिषद दर दोन वर्षांनी एकदा आयोजित केली जाते.
बुध्दीस्ट परिषदेमध्ये सहभागी प्रतिनिधींच्या स्वागतासाठी महाराष्ट्र सज्ज
                                                 पर्यटन मंत्री जयकुमार रावल
6 व्या आंतराराष्ट्रीय बुध्दीस्ट परिषदेच्या  दुस-या टप्प्याचा कार्यक्रम प्रथमच अजंठा येथे होणार आहे. यासाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी माहिती दिली.
महाराष्ट्र  बिहारच्या राजगीर, नालंदा बोधगया आणि उत्तरप्रदेशातील सारनाथ  येथे परिषद होणार आहे. उद्या शुक्रवार 24 ऑगस्ट रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील  जग प्रसिद्ध अजंठा लेण्यांच्या ठिकाणी परिषद होणार आहे. अजंठा लेणींचा समावेश युनोस्कोंच्या जागतीक पर्यटन स्थळांमध्ये आहे. महाराष्ट्राचा हा ऐतिहासिक  खजिना जगासाठी खुला आहे. महाराष्ट्रात जवळपास 300 बुध्दीस्ट लेणी आहेत. या परिषदेच्या माध्यमातून यांची माहितीही जगभर पोहोचेल, असा विश्वास श्री रावल यांनी यावेळी व्यक्त केला.  परिषदेत सहभागी होण्यासाठी येणारे प्रतिनिधी मंडळ महाराष्ट्रातील मराठमोळया संस्कृतीच्या स्वागताने नक्कीच भारावतील आणि वांरवार महाराष्ट्रात पर्यटनासाठी येतील, असा विश्वासही श्री रावल यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रातील बौध्द धर्मीय ऐतिहासिक लेण्या, स्तुप, चैत्य याबाबत सादरीकरण महाराष्ट्राचे पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सुहास दिवसे यांनी सादर केले.

No comments:

Post a Comment