Tuesday, 21 August 2018

सिंधुदुर्ग विमानतळावर परदेशी विमाने उतरण्याची परवानगी मिळावी : दिपक केसरकर




नवी दिल्ली, 21 :  सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या विमानतळावर परदेशी विमाने उतरण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव गृहराज्य मंत्री दिपक केसरकर यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे मांडला.
येथील राजीव गांधी भवनात आज श्री केसरकर यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या विमानतळाबाबत सविस्तर चर्चा केली. याबैठकीस नागरी विमान वाहतुक महासंचालनालयाचे वरीष्ठ अधिकारी, इनफ्रास्ट्रकचर डेवलपर्स लिमीटेडचे प्रकल्प संचालक उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पर्यटन जिल्हा आहे. असंख्य परदेशी पर्यटक या ठिकाणी येतात. यासाठी येथे उभारण्यात येणा-या विमानतळावर परदेशी विमाने उतरविण्यात यावे, अशी मागणी श्री केसरकर यांनी बैठकीत केली.
सिंधुदुर्ग विमानतळाचे बांधकाम पुर्णत्वास आले असून गणेश चतुर्थीच्या आदल्यादिवशी 12 सप्टेंबर 2018 ला माल्टा देशातील विमान चाचणीसाठी या ठिकाणी उतरविण्यात यावे, यावरही बैठकीत चर्चा झाली. यासाठी आवश्यक असणा-या परवानग्या मिळाव्या, अशी विनंती श्री केसरकर यांनी यावेळी केली.
सिंधुदुर्ग येथील विमानतळ आधुनिक सुविधेसह सुसज्ज असावे. खाजगी अंतरराष्ट्रीय विमाने याठिकाणी आठवडयातून तीन दिवस उतरण्यासंदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर झालेला  आहे.  तसेच, या ठिकाणी माल वाहतुकीसाठी खाजगी  कार्गो हब उभारण्यात यावे. येथे विमानतळ उभारण्यात येत असल्यामुळे या परिसरात नागरी उड्डयणाचे खाजगी शिक्षण केंद्रही असावे, असा प्रस्ताव श्री केसरकर यांनी आज बैठकीत मांडला, याबाबत केंद्रीय मंत्री श्री प्रभु यांनी सकारात्मकता दर्शविली असल्याची माहिती श्री केसरकर यांनी दिली.

No comments:

Post a Comment