Thursday, 4 October 2018

उन्नत भारत अभियानासाठी महाराष्ट्रातील १६० उच्च शैक्षणिक संस्थांची निवड










                 महात्मा गांधी यांचे १५० वे जयंती वर्ष साजरे करण्यात सहभाग
नवी दिल्ली, ४ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करण्यासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने हाती घेण्यात आलेल्या ‘उन्नत भारत’ अभियानासाठी महाराष्ट्रातील एकूण १६० उच्च शैक्षणिक  संस्थांची  निवड  करण्यात  आली  आहे.
            केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने ‘उन्नत भारत अभियासाठी’ देशभरातील ८४० उच्च शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील ३३ जिल्हयातील ७५ तांत्रिक व ८५ अतांत्रिक अशा एकूण १६० उच्च शैक्षणिक संस्थांचा यात समावेश आहे. देशभरातून निवड झालेल्या एकूण ८४०  शैक्षणिक संस्थांपैकी ५२१ तांत्रिक तर ३१९ अतांत्रिक आहेत.
            यापूर्वी उन्नत भारत अभियान कार्यक्रमाच्या  पहिल्या टप्प्यात देशातील ६८८ शैक्षणि‍क संस्थांची निवड करण्यात आली होती. या वर्षी साज-या होत असलेल्या महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त  विविध कार्यक्रमांमध्ये या संस्था सहभागी होत आहेत.
                                   उन्नत भारत अभियानांतर्गत हे कार्यक्रम राबविण्यात येणार
        उन्नत भारत कार्यक्रमांतर्गत  फील्ड व्हिझीट , घरो-घरी जावून सर्वेक्षण , ग्रामीण जनतेच्या समस्या व गरजांची माहिती घेणे आणि त्यांचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी विविध तंत्र व कार्यपध्दती विकसित करणे आदींचा समावेश आहे.
                                       राज्यात सर्वात जास्त ३३ संस्था पुणे जिल्हयातील
                             पश्चिम महाराष्ट्रातील ५३ शैक्षणिक संस्था
    पुणे जिल्हयातून सर्वात जास्त ३३ संस्थांची निवड या कार्यक्रमासाठी झाली आहे. यातील २३ तांत्रिक तर १० अतांत्रिक संस्था आहे. पुणेसह पश्चिम महाराष्ट्राच्या ५ जिल्हयातील ३१ तांत्रिक आणि २२ अतांत्रिक अशा एकूण ५३ संस्थाची निवड करण्यात आली आहे
                                         विदर्भातील ३३ शैक्षणिक संस्थांची निवड
        या अभियानांतर्गत विदर्भातील एकूण ११ जिल्हयातील १७ तांत्रिक आणि १५ अतांत्रिक अशा एकूण ३३ शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे.
                                                      २९ संस्था मराठवाडयातील
 मराठवाडयातील अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद आणि परभणी या जिल्हयांतील ७ तांत्रिक व २२ अतांत्रिक अशा एकूण २९ संस्थांची निवड झाली आहे.  
                                                 खानदेशातील २४ संस्थांची निवड   
            जळगाव ,धुळे,नंदुरबार आणि नाशिक या खानदेशातील जिल्हयांतून १३ तांत्रिक व ११ अतांत्रिक अशा एकूण २४ शैक्षणिक संस्थांची निवड करण्यात आली आहे. 
              कोकणातील रायगड  व सिंधुदुर्ग या दोन जिल्हयातील ३ तांत्रिक व ५ अतांत्रिक अशा एकूण ८ संस्थाची तर मुंबईतील  २ तांत्रिक व  २ अतांत्रिक अशा एकूण ४ , मुंबई उपनगरातील ३ अतांत्रिक तर ठाणे जिल्हयातील ४ तांत्रिक व २ अतांत्रिक अशा एकूण ६ शैक्षणिक संस्थाची निवड उन्नत भारत अभियानासाठी करण्यात आली आहे.
    बातमी  सोबत  महाराष्ट्रातील  निवड झालेल्या शैक्षणिक संस्थांच्या नावाची यादी जोडली आहे.                                            
                                         00000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 367/ दिनांक  04.10.2018


No comments:

Post a Comment