Friday, 30 November 2018

डॉ. अजय भुषण पांडे यांनी स्वीकारला केंद्रीय महसूल सचिवपदाचा पदभार


     
      
नवी दिल्ली, ३० : भारतीय प्रशासकीय सेवेच्या महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ अधिकारी तथा ‘युनीक आयडेंटीफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अजय भुषण पांडे यांनी आज केंद्रीय अर्थमंत्रालयाचे महसूल सचिव म्हणून पदभार स्वीकारला  

            अर्थमंत्रालयाचे महसूल सचिव डॉ. हसमुख आडिया आज सेवानिवृत्त झाले, रिक्त झालेल्या या  पदावर डॉ. अजयभुषण पांडे यांची निवड झाली असून डॉ आडिया यांनी डॉ. पांडे यांना आपल्यापदाची सुत्रे सुपूर्द केली. डॉ. पांडे हे नव्या नियुक्तीसह ‘युनीक आयडेंटीफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम पाहतील तसेच वस्तू व सेवाकर नेटवर्क (GSTN)  या सरकारी उपक्रमाचे अध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळणार आहेत.
                            आधारकार्डची सांख्यिकी माहिती बळकट करण्यात मोलाचे योगदान  
महाराष्ट्र शासन व केंद्र शासनामध्ये गेल्या ३४ वर्षांपासून कार्यरत डॉ. पांडे यांनी सामान्य मानसाची ओळख म्हणून प्रसिध्द असणा-या आधार कार्डची सांख्यिकी माहिती बळकट करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. गेल्या आठ वर्षांपासून‘युनीक आयडेंटीफीकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ मध्ये कार्यरत डॉ. पांडे यांनी कायदा तयार करून  आधार कार्डसाठी लागणारा सांख्यिकी पाया मजबूत केला. सर्वोच्च् न्यायालयात दाखल ३७ याचिकांना सामारे जात त्यांनी ५ न्यायधिशांच्या पीठासमोर सलग दोन दिवस केलेल्या सादरीकरणातून  आधार कार्ड करिता वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, या कार्डचे महत्व  व उपयुक्तता पटवून दिली होती.     
                                                    महाराष्ट्रात वीज वितरणातील नुकसानास आळा                     
        डॉ. पांडे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून वीज वितरणाची व्यवस्था बळकट करत राज्यातील वीजेची तूट भरून काढण्यात महत्वपूर्ण भूमिका निभवली. त्यांनी राज्यातील वीज प्रसार व गळतीचे प्रमाण कमी करून राज्याच्या नुकसानास आळा घातला. यासोबतच राज्याच्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांनी  राज्याच्या महत्वाकांक्षी ‘ई-गव्हर्नन्स’ प्रकल्पात उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी राज्य शासनाच्या विक्रीकर विभागात महत्वाच्या पदावर कार्य केले आहे.
                                               कानपूर आयआयटीमधून अभियांत्रिकी पदवी      
        डॉ. पांडे यांनी आयआयटी कानपूर मधून इलेक्ट्रीकल अभियांत्रिकीत पदवी मिळविली. १९९८ मध्ये त्यांनी मिनेसोटा विद्यापीठात प्रवेश घेतला व येथे संगणक विज्ञान विषयात एमएस आणि पीएचडी पदवी मिळविली.
           
    महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.४०८/  दिनांक ३०.११.२०१८ 

No comments:

Post a Comment