Tuesday 1 January 2019

10 जणांचे प्राण वाचवणा-या सिद्दरामेश्वर हुमानाबादेला 1 लाखाचे पारितोषिक



      
                           
नवी दिल्ली, 1 :  मुंबईच्या अंधेरीभागातील इएसआयसी रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 जणांचे प्राण वाचवून साहसी वृत्तीचा परिचय देणा-या मुंबई येथील सिद्दरामेश्वर हुमानाबादे यांचा आज केंद्रीय कामगार व रोजगार कल्याण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष गंगवार यांनी 1 लाखाचे पारितोषिक देवून आज येथे गौरव केला.
            केंद्रीय कामगार व रोजगार कल्याण मंत्रालयांतर्गत कार्यरत मुंबई येथील अंधेरी परिसरातील राज्य कर्मचारी विमा मंडळाच्या (इएसआयसी) रूग्णालयात  17 डिसेंबर 2018 रोजी अचानक आग लागली. आगीने रौद्र रूप धारण केले , याप्रसंगी साहस व समयसूचकतेचा परिचय देत फूड डिलेव्हरी बॉय, सिद्दरामेश्वर हुमानाबादे यांनी आगीत सापडलेल्या लोकांना मदतीचा हात दिला. यावेळी हुमानाबादे यांनी 10 लोकांचे प्राण वाचवले या साहसी कार्याची दखल घेत केंद्रीय राज्य्‍मंत्री श्री. गंगवार यांनी केंद्रीय कामगार व रोजगार कल्याण मंत्रालयात  हुमानाबादे यांना 1 लाखाचे पारितोषिक देवून गौरव केला.
            यावेळी श्री. गंगवार म्हणाले,  मुंबईतील रूग्णालयात लागलेल्या आगीप्रंसगी जीवाची तमा न बाळगता सिद्देरामेश्वर हुमानाबादे यांनी आगीत अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे केलेले साहसी कार्य कौतुकास्पद आहे. आगीतील दूषित वायूने हुमानाबादे यांना श्वास घेण्यास अडचणही झाली तरीही त्यांनी पीडितांना वाचविण्यासाठी निकाराचे प्रयत्न सुरु ठेवले . इएसआयसी रूग्णालयाचे कर्मचारी नसतानाही आगीत सापडलेल्या लोकांचे प्राण वाचवून  हुमानाबादे यांनी दाखवलेले साहस आणि  निरपेक्ष सेवाभाव हा इएसआयसी च्या संपूर्ण चमुसाठी व संपूर्ण देशवाशियांसाठी आदर्शवत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.
        महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
                              http://twitter.com/micnewdelhi                        
 000000 
रितेश भुयार /वृत्त वि. क्र.01/  दिनांक १.१.२०१९ 

No comments:

Post a Comment