Thursday 24 January 2019

राजपथावरील 'एनएसएस' पथकाचे नेतृत्व महाराष्ट्राकडे


                               दर्पेश डिंगर करणार नेतृत्व

नवी दिल्ली, २४ : राजपथावरील पथसंचलनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या (एनएसएस) पथकाचे नेतृत्व करण्याचा मान महाराष्ट्राकडे आला आहे. पुणे येथील सिंहगड  इन्स्टिटयूट ऑफ इंजिनियरींग कॉलेजचा विद्यार्थी दर्पेश डिंगर एनएसएस पथकाचे नेतृत्व करणार आहे.

महाराष्ट्रातील सर्वच 14 आणि गोव्यातील 2 अशा एकूण 16 विद्यार्थी- विद्यार्थींनीची या पथसंचलनासाठी निवड झाली आहे. देशभरातील 15 विभागांमधून एकूण 200 एनएसएस स्वयंसेवक या शिबिरात सहभागी झाले असून यापैकी 160 विद्यार्थ्यांची पथसंचलनासाठी निवड झाली आहे

                                                दर्पेशच्या मेहनतीला यश  
मुळचा नाशिक जिल्ह्यातील मालेगांव तालुक्यातील तोकडे गावचा दर्पेश डिंगर याने आवाज, शिस्त, नियमितता व मेहनतीच्या जोरावर राजपथावरील पथसंचलनात एनएसएस पथकाच्या नेतृत्वाचा मान पटकविला   आहे. प्रजासत्ताक दिनी राजपथावर पथसंचलनात सहभागी होण्यासाठी एन एस एस च्या विद्यार्थ्यांमध्ये देशपातळीवर मोठी स्पर्धा असते. पथसंचलनातून संपूर्ण देशातील सामर्थ्य व संस्कृतीचे दर्शन घडते या सोहळ्यात सहभागी 160 विद्यार्थ्यांच्या एनएसएस पथकाचे नेतृत्व करायला मिळणे ही अभिमानाची बाब असल्याची भावना दर्पेशने व्यक्त केली.
यापूर्वी प्रजासत्ताक दिनी राजपथावरील पथ संचलनात राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे नेतृत्व करण्याचा बहुमान महाराष्ट्राच्या सोपान मुंडे, खूशबु जोशी आणि आसीफ शेख यांनी मिळविला आहे.
     यावर्षी प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणा-या पथसंचलनासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयांतर्गत येथील चाणक्यपुरी भागातील इंटरनॅशनल यूथ होस्टेल येथे एनएसएस सराव शिबिराला 1 जानेवारी पासून सुरुवात झाली आहे. एनएसएसच्या देशभरातील 15 विभागांमधून एकूण 200 एनएसएस विद्यार्थ्यी यात सहभागी झाले आहेत.
                                                                 0000
आम्हाला ट्विटर वर  फॉलो करा  http://twitter.com/MahaGovtMic                                                                     
                                                          00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.33/दि.24.01.2019






No comments:

Post a Comment