महाराष्ट्राची
हस्तकला, व्यंजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची असणार रेलचेल
नवी दिल्ली, 29 :
हरियाणातील
फरिदाबाद येथे यावर्षी आयोजित 33 व्या ‘सुरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळयाच्या’ थीम
स्टेटचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकीक प्राप्त् या मेळयात
ऐतिहासिक रायगड किल्याची प्रतिकृती मुख्य आकर्षण
असणार आहे.
राज्याची
ओळख दर्शविणा-या बैलगाडया, पारंपारिक घरे, शेतीतील अवजारांच्या प्रतिकृतींची सजावट
करण्यात आली असून राज्याची हस्तकला, व्यंजन
व संस्कृती या मेळयात बघायला मिळणार आहे.
सुरजकुंड मेळा प्राधिकरण व हरियाणा राज्य
पर्यटन विभाग, केंद्र शासनाचे पर्यटन विभाग, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक विभाग, परराष्ट्र
व्यवहार विभाग यांच्या संयुक्त् विद्यमाने 1 ते 17 फेब्रुवारी 2019 दरम्यान 33 व्या सुरजकुंड मेळयाचे आयोजन करण्यात
आले आहे. देशातील 29 राज्य् आणि 7 केंद्रशासित प्रदेश तसेच एकूण 30 देश या मेळयात
सहभागी होत आहेत. या मेळयात थायलंडला सहयोगी
देशाचा मान मिळाला आहे.
राज्यातील हस्तकला वस्तुंचे
75 स्टॉल्स
थिम स्टेटचा मान मिळाल्यामुळे
महाराष्ट्रातील हस्तकला दालनेही या मेळयात मोठया प्रमाणात दिसणार आहेत. महाराष्ट्र
राज्य लघुउद्योग विकास महामंडळ, आदिवासी विकास विभाग, महिला विकास विभाग आणि वस्त्रोद्योग
विभागाच्या एकूण 75 स्टॉल्सच्या माध्यमातून राज्यातील हस्तकलेच्या वस्तु येथे विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. यामुळे राज्यातील
हस्तकलाकारांना मोठा मंच उपलब्ध होणार आहे.
रायगडाची
भव्य प्रतिकृती जागवणार गौरवशाली इतिहास
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक
सोहळा पार पडलेला ऐतिहासिक रायगड किल्ला या मेळयात महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जागविणार
आहे. मेळयाच्या मुख्य कार्यक्रमस्थळ असणा-या मुख्य चौपालाच्या शेजारीच 500 चौ.फुट जागेत
भव्य रायगड किल्ला उभारण्यात आला आहे. डोंगर व त्यात वसलेला भव्य रायगड किल्ला उभारण्यात
आला असून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा,
मेघडंबरी , किल्ल्यावरील दोन बुरूज दर्शविण्यात
आले आहेत.
‘वासुदेव’, ‘भारुड’ आदी लोककलांचे घडणार पदोपदी दर्शन
महाराष्ट्राची
समृध्द लोककलाही या मेळयात ठिकठिकाणी पहायला मिळणार आहे. वासुदेवाच्या वेशातील कलाकार
या मेळयात भेटदेणा-या देश-विदेशातील लोकांना महाराष्ट्राची सकाळ अनुभवायला लावणार
आहे. तसेच या मेळयात सांस्कृतिक कार्यकम व मनोरंजानासाठी उभारण्यात आलेल्या विशेष कट्टयावर महाराष्ट्रातील कलाकार भारूड, लावणी
आदि लोककला सादर करणार आहेत.
सांस्कृतिक
कार्यक्रमांची धुरा महाराष्ट्राकडे
मेळयात मुख्य चौपालावर दररोज सायंकाळी विविध राज्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम
सादर होणार असून महाराष्ट्राला महत्वाचे तीन दिवस सांस्कृतिक कार्यक्रमांची धुरा देण्यात
आली आहे. मेळाव्याच्या उद्घाटनाच्या दिवशी 1 फेब्रुवारीला
महाराष्ट्राच्या वैविद्यपूर्ण सांस्कृतिक वारशासह
‘शिवाजी महाराजांचा गनीमा कावा’ सांस्कृतिक
कार्यक्रमाच्या माध्यमातून दर्शविण्यात येणार आहे. 7 व 9 फेब्रुवारी रोजीही महाराष्ट्राच्या
वैविद्यपूर्ण संस्कृतिचे दर्शन घडविणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहे. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक संचालनालय या सर्व कार्यक्रमाचे
संयोजन व समन्वय करणार आहे.
महाराष्ट्राचा महाखाद्य स्टॉल
पुरणपोळी, पिठलं-भाकरी, झुनका-भाकर, कोल्हापूरी मटन,
सावजी मटन यांच्यासह महाराष्ट्राची वैविद्यपूर्ण खाद्यसंस्कृती दर्शविणारा
खाद्य वस्तुंचा खास स्टॉलही मेळयाला भेट देणा-या खवय्यांचे आकर्षण असणार आहे.
महाराष्ट्राला दुस-यांदा थीम
स्टेटचा मान
हरियाणातील
फरिदाबाद येथे 1986 पासून सुरु असलेल्या सुरजकुंड
आंतरराष्ट्रीय शिल्प मेळयात भारतातील विविध राज्यांच्या हस्तकला, व्यंजन व सांस्कृतीची
ओळख व्हावी या उद्देशाने 1987 पासून थीम स्टेट ची संकल्पना राबविण्यात येत आहे. राजस्थानला
थीम स्टेटचा पहिला मान मिळाला होता. महाराष्ट्राला 2006 मध्ये थीम स्टेटचा बहुमान मिळाला
होता व 13 वर्षानंतर पुन्हा राज्याला हा बहुमान मिळाला आहे.
00000
रितेश भुयार/वि.वृ.क्र.45/दि.29.01.2019
No comments:
Post a Comment