नवी दिल्ली, 29 : महाराष्ट्रातील प्रसिध्द मराठी चिंतनशील लेखक डॉ. मधुकर पाटील लिखित 'सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध' या समीक्षा ग्रंथास सर्वोत्कृष्ट
मराठी कलाकृती आणि रहमान अब्बास यांच्या ‘रोहज़ीन’ या उर्दू कांदबरीला वर्ष २०१८ साठीचा साहित्य अकादमी पुरस्कार आज प्रदान
करण्यात आला.
येथील कमानी सभागृहात एका शानदार कार्यक्रमात साहित्य
अकादमी पुरस्कार वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे
प्रसिद्ध उडीया लेखक मनोज दास, श्रीलंकेचे
प्रसिद्ध लेखक संनथन अयाथ्युराय, साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर खंबार,
उपाध्यक्ष माधव कौशिक, सचिव के. श्रीनिवासराव यावेळी मंचावर उपस्थित होते. देशातील २४
प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट साहित्यकृती व लेखकांना यावेळी
पुरस्कृत करण्यात आले.
‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या समीक्षा कृती विषयी
मौज
प्रकाशनाने १८ एप्रिल २०१३ मध्ये ‘सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध’ या ग्रंथाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली. या ग्रंथात डॉ. म.सु.पाटील यांनी कलानिर्मितीच्या आदिम प्रेरणा, त्या प्रेरणांशी अनुबंध असणारे छंद, लय, आत्माविष्कार, भावक्रीडा इत्यादी विविध पैलूंचा मानसशास्त्रीय अंगाने
मागोवा घेतला आहे.
सर्जनशक्तीचे
विकसन कसकसे होते याचा धांडोळा घेतानाच विचार, तत्वज्ञान, सौंदर्य आणि कलामीमांसा यांचे वेचक कवी आणि त्यांच्या कविता
यांच्या उदाहरणांतून अभिजात आणि रोमँटिक काव्यविचाराशी निगडित असलेले नातेही ते
उलगडून दाखवतात. त्याची
व्याप्ती विसाव्या शतकाच्या अखेरच्या पर्वातील नवकवीच्या काहीशा वास्तवनिष्ठ आणि
बुध्दिनिष्ठ कवितांपर्यंत पोचते.
डॉ. पाटील यांच्या पी.एच.डी वर आधारित हे तिसरे पुस्तक आहे. यापूर्वी २००४ मध्ये ‘तुकाराम :अतंर्बाहय संघर्षाची अनुभवरूपे’
आणि २००६ मध्ये ‘ज्ञानेश्वरीचा काव्यबंध’ ही दोन पुस्तके मुंबई येथील शाब्दल प्रकाशनाने प्रसिध्द
केली आहेत. संत
ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या काव्याचा अभ्यास करताना कोणता काव्य विचार
उपयुक्त ठरेल याचा अभ्यास करण्याच्या शोधातून या तिस-या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. भरतमुनी आणि प्लेटो-ॲरिस्टॉटल यांच्या पासून गेल्या शतकाच्या साठ-सत्तरच्या दशकापर्यंत झालेल्या काव्यविचारांचा
या पुस्तकात धांडोळा घेण्यात आला आहे. या ग्रंथात एकूण सात प्रकरणे असून यात सर्जनाच्या प्रेरणा, कविमन, काव्यात्म अनुभव आदिंचा समावेश आहे.
रहमान अब्बास लिखित ‘रोहज़ीन’
उर्दू कांदबरी
रहमान
अब्बास यांना त्यांच्या ‘रोहज़ीन’ या उर्दु भाषेतील कांदबरीसाठी साहित्य अकादमीचा
पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार प्राप्त झाल्यावर दिलेल्या प्रतिक्रीयेत श्री अब्बास यांनी कांदबरीचे वर्णन करतांना
सांगितले, रोहज़ीन ही कांदबरी मुंबईच्या
जीवनावर आधारित आहे. मागील चाळीस वर्षात मुंबईमध्ये जे सामाजिक, राजकीय परिवर्तन झालेले आहेत त्याचा मागोवा यामध्ये
घेण्यात आलेला आहे. कांदबरीत मुंबादेवी हे चरित्र घेऊन लिहीलेले आहे. ही कांदबरी प्रेमावर
आधारित असून यामध्ये 26 जुलै 2005 मध्ये मुंबईमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या
परिणामांची मीमांसा कांदबरीत करण्यात आलेली असल्याचे श्री अब्बास यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment