Wednesday, 27 February 2019

बोदवड परिसर सिंचन योजनेचा उर्वरित 433 कोटींचा निधी मिळणार : जलसंपदा मंत्री गिरीष महाजन








नवी दिल्ली, 27 : जळगाव जिल्हयातील बोदवड परिसर सिंचन योजनेसाठी केंद्राकडून मंजूर निधीपैकी उर्वरित 433 कोटी 44 लाखांचा निधी राज्याला मिळणार असून या प्रकल्पाच्या कामाला गती येईल अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज दिली.

श्रमशक्ती भवन येथे आज केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील महत्वाच्या सिंचन प्रकल्पांबाबत झालेल्या बैठकीत श्री. महाजन उपस्थित होते. या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.

या योजनेसाठी केंद्राकडून दयावयाचा उर्वरित 433 कोटी 44 लाखांचा निधी राज्याला लवकरच देण्यात येईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांनी दिल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले. या संबंधात केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाच्या तांत्रिक सल्लागार समितीला श्री गडकरी यांनी आजच्या बैठकीत सूचना दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

केंद्र शासनाने मंजूर केले होते 500 कोटी

या सिंचन योजनेसाठी वर्ष 2012 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने 500 कोटी रूपये विशेष सहायता निधी म्हणून मंजूर केले होते. यानुसार 2014 -15 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी 200 कोटींची तरतूद करण्यात आली पैकी केंद्राकडून प्रत्यक्ष 66.66 कोटींचा निधीच राज्याला प्राप्त झाला. यानंतर केंद्राकडून राज्याला निधी उपलब्ध झालेला नसल्याने या प्रकल्पाच्या कामाचा वेग मंदावला आहे. हा प्रकल्प वर्ष 2020 पर्यंत पूर्ण करण्याच्या उदिष्टय असून केंद्राकडून उर्वरित निधीची मागणी आजच्या बैठकीत श्री. महाजन यांनी केली.
 
42 हजार 420 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार

जळगाव जिल्हयातील बोदवड तालुक्यातील बोदवड परिसर सिंचन योजना एक महत्वाकांक्षी योजना असून 193 दशलक्षघन मीटर क्षमतेच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून परिसरातील 42 हजार 420 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

याबैठकीत जळगाव जिल्हयातील गिरणा नदिवर उभारण्यात येणा-या 7 बलून बंधा-याला केंद्र शासनाकडून अनुदान मिळण्याबाबत व राज्यातील 5 आकांक्षी जिल्हयात केंद्रीय योजनांमधून सिंचन व्यवस्था बळकट करण्याबाबतही चर्चा झाल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.

 
आम्हाला ट्विटर वर फॉलो करा http://twitter.com/MahaGovtMic
0000
रितेश भुयार /वृत्त वि. क्र. 84 / दिनांक 27.2.2019

No comments:

Post a Comment