Saturday 20 July 2019

ओंकार नवलिहाळकर आणि विनीत मालपुरे यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार
















नवी दिल्ली, 20 :  कोल्हापूर जिल्हयातील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्हयातील विनीत मालपुरे या तरुणांची वर्ष 2016-17 च्या राष्ट्रीय युवा पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या 12 ऑगस्ट रोजी दिल्लीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
            केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्यावतीने उत्कृष्ट कार्यासाठी देण्यात येणा-या राष्ट्रीय युवा पुरस्कारांसाठी देशभरातील 25 तरूणांची निवड करण्यात आली असून कोल्हापूरजिल्हयातील ओंकार नवलिहाळकर आणि नाशिक जिल्हयातील कळवण येथील विनीत मालपुरे यांचा यात समावेश आहे.
            ओंकार नवलिहाळकर हे कोल्हापुरातील आपत्कालीन सेवा संस्थांच्या माध्यमातून समाजसेवी उपक्रमांमध्ये  ब-याच वर्षांपासून कार्यरत आहेत. जीवन ज्योत आपत्कालीन सेवा संस्था, जीवन मुक्ती आपत्कालीन सेवा संस्थांसोबत कार्यकरत त्यांनी अनेक लोकांचे प्राण वाचवले आहे. 
            सलाम मुंबई फाऊंडेशन च्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर मधील शाळा तंबाखूमुक्त करण्यामध्ये ओंकार यांनी महत्त्वाचे योगदान दिले. शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याकडून तंबाखू मुक्ती ची शपथ घेतली. ओंकार एका डोळ्याने दिव्यांग असून देखील राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या झालेल्या प्रशिक्षणात  संपूर्ण महाराष्ट्रातून ओंकारचा प्रथम क्रमांक आला. संसदवारी उपक्रमांतर्गत  त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ओंकारने भेट घेतली होती.
विनित मालपुरे यांनी केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून  युवा विकासाचे उल्लेखनीय कार्य केले असून त्यांनी हे कार्य ग्रामीण भागापर्यत  पोहचविले आहे. युवा विकास कार्याच्या माध्यमातून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर राष्ट्रकुल युवा परिषदेत सहभाग घेत भारताचे प्रतिनिधीत्व  केले आहे. मालपुरे यांच्या कार्याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना  ‘राज्य युवा  पुरस्काराने’ सन्मानित केले आहे. सामाजिक क्षेत्रातील योगदानासाठी विनीत यांचा ‘राष्ट्रीय गौरव सन्मान 2018’ ने गौरव करण्यात आला आहे.
येत्या 12 ऑगस्ट रोजी दिल्लीत राष्ट्रीय युवा  पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. 40 हजार रूपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
     महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा . http://twitter.com/MahaGovtMic                                          000000 
रितेश भुयार  /वृत्त वि. क्र.165 /  दिनांक  20.०७.२०१९ 


No comments:

Post a Comment